गडचिरोली : कचरा जमा करण्यासाठी शहराच्या विविध भागात नगर परिषदेने ३५ कचरा कंटेनर ठेवल्या आहेत. कंटेनरमध्ये कचरा जमा झाल्यानंतर काही बेजबाबदार नागरिक कंटेनरला आग लावत असल्याने कंटेनर भंगार झाले आहेत. त्याचबरोबर आगीच्या धुरामुळे शहरातील नागरिकांना श्वसनाचेही आजार वाढले आहेत. शहरात स्वच्छता राखण्यासाठी नगर परिषदेचे जवळपास २० स्वच्छता कर्मचारी घंटागाड्या घेऊन प्रत्येक वार्डात सकाळच्या सुमारास फिरतात. मात्र एखादेवेळी घंटागाडी वॉर्डात न फिरल्यास किंवा एखाद्याला घंटागाडीमध्ये कचरा टाकण्यास न मिळाल्यास कचरा इतरत्र फेकला जाऊ नये, यासाठी शहरातील विविध भागात नगर परिषदेने ३५ कचरा कंटेनर ठेवल्या आहेत. काही नागरिक या कचरा कंटेनरमध्ये जमा करतात. जमा झालेल्या कचऱ्याला काही नागरिक आग लावून देतात. आगीमुळे कंटेनरचा रंग निघतो. त्याचबरोबर जास्त गरम झाल्यामुळे कंटेनर कडक बनून लवकरच भंगारात फेकण्याच्या स्थितीत तिची अवस्था बनते. त्यामुळे नगर परिषदेचे आर्थिक नुकसान होते. शहरी कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्रमाण प्लास्टिकचे राहते. प्लास्टिकचा कचऱ्याचे लवकर विघटन होत नाही. त्याचबरोबर प्लास्टिक जळाल्यामुळे वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांचा प्लास्टिक जाळण्यालाही विरोध आहे. कंटेनरच्या चारही बाजुला घरे राहतात. अशा स्थितीत आगीचा धूर सभोवतालच्या परिसरामध्ये पसरते. अनेक वेळा प्रचंड धुरामुळे श्वास घेणे कठीण होऊन बसते. प्लास्टिकसारख्या इतर घातक पदार्थ्यांच्या जळण्यामुळे निर्माण झालेल्या धुरातून श्वसनाचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सदर आग नगर परिषदेचे कर्मचारी लावत नसून सभोवतालचे काही बेजाबाबदार नागरिक आग लावत असल्याचा नगर परिषद प्रशासनाचा दावा आहे. तर नागरिक नगर परिषदेचे कर्मचारी आग लावत असल्याचे सांगतात. त्यामुळे आग लावणारा नेमका कोण, हे कळायला मार्ग नाही. मात्र सभोवतालच्या घरातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत असल्याने आग लावणाऱ्यावर नगर परिषद प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.नगर परिषद प्रशासनाने मागील वर्षीच सुमारे २३ कंटेनर खरेदी केल्या. प्रत्येक कंटनेर जवळपास १० हजार रूपयांचा असून त्याचे किमान आयुष्य आठ वर्ष आहे. मात्र आग लावण्याच्या प्रकारामुळे एक़ वर्षातच सदर कंटेनर भंगार झाले आहेत. भंगार कंटेनर व्यवस्थित उचलला जात नसल्याने नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही बराच त्रास सहन करावा लागत आहे. कंटेनर ही आपली संपत्ती आहे. त्याचबरोबर आग लावल्यामुळे होणारे आजार लक्षात घेता कंटेनरला आग लावू नये, अशी मागणी होत आहे.
आगीमुळे कंटेनर भंगार
By admin | Published: November 03, 2014 11:25 PM