गडचिराेली : काेराेनाकाळात नियुक्त करण्यात आलेल्या आराेग्यसेविकांना आता कामावरून काढून टाकण्यात आले आहे. हे सर्व कर्मचारी आता बेराेजगार झाले आहेत. आपल्याला पुनर्नियुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी आयटकच्या नेतृत्त्वात आराेग्य सेविकांनी २९ जुलै राेजी जिल्हा परिषदेसमाेर निदर्शने केली. मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले.
काेराेनाकाळात कंत्राटी तत्त्वावर आराेग्यसेविकांना तीन महिन्यांचे आदेश देऊन नियुक्ती करण्यात आली. जुलै महिन्यात करारनाम्याचा कालावधी संपला. काेराेना महामारी अजूनही सुरूच आहे. मात्र, कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. या आराेग्य सेविकांची पुनर्नियुक्ती करावी. तीन महिन्यांचे थकीत मानधन त्वरित द्यावे. आराेग्यसेविकांना शासनसेवेत कायम करावे. एनआरएचएममध्ये रिक्त असलेल्या जागेवर या कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी आदी मागण्यांसाठी निदर्शने केली. आंदाेलनाचे नेतृत्व आयटकचे अध्यक्ष देवराव चवळे, कामगार नेते डाॅ. महेश काेपुलवार, ॲड. जगदीश मेश्राम यांनी केले.
यावेळी मीनाक्षी राऊत, प्रतीक्षा रामटेके, प्रियंका झाडे, सपना नैताम, सगुना कुमरे, गीता नराेटे, साेनी काेल्हे, पल्लवी केळझरकर, शालिनी रामटेके, प्रीती राऊत, भाग्यश्री हिचामी, मेघा मडावी हजर हाेते.