लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : १६ मे रोजी आलापल्लीसह परिसराला वादळाचा जोरदार तडाखा बसला होता. या वादळामुळे वनविभागाच्या वसाहतीतील अनेक घरांचे छत उडून गेले. मागणी करूनही या छताची दुरूस्ती होत नव्हती. दुरूस्तीसाठी विलंब होत असल्याबाबतचे वृत्त लोकमतने मंगळवारी ‘वादळानंतर डोक्यावर मरण घेऊन राहत आहेत वनकर्मचारी’ या मथळ्याखाली प्रकाशित केले. या वृत्ताची दखल वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली. त्यानंतर बुधवारपासून कर्मचारी वसाहतीतील निवासस्थानाच्या दुरूस्तीचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे.आलापल्ली येथे वादळाने वनकर्मचाऱ्यांच्या वसाहतीला जोरदार तडाखा बसला. अनेक कर्मचाऱ्यांच्या घरावरील छत उडून गेल्याने त्यांच्यासमोर निवासाचा प्रश्न निर्माण झाला होता. वादळाने नुकसान झाल्याला मंगळवारी सहा दिवस पूर्ण झाले. मात्र वनविभागाच्या वतीने निवासस्थान दुरूस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली नव्हती. वादळ व पावसापासून संरक्षण करण्यासाठी काही वनकर्मचाऱ्यांनी तात्पुरती सोय म्हणून आपल्या निवासस्थानाच्या छतावर ताडपत्री झाकली होती. मात्र सध्या तापमान प्रचंड असल्याने उकाड्याचा त्रास वनकर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सहन करावा लागत होता. अवकाळी वादळी पाऊस गेल्या काही दिवसांपासून बरसत असल्याने वनकर्मचाऱ्यांचे कुटुंबिय चिंतेत सापडले होते. अवकाळी वादळी पाऊस बरसल्यास घरातील साहित्याचे नुकसान होण्याचीही भीती येथील अनेक वनकर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सतावत होती. बुधवारी मध्यरात्री ३.३० वाजताच्या सुमारास आलापल्लीत अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान छतावरील टिनाचे छत आधीच उडाले असल्याने कर्मचारी धास्तावले. त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला.बुधवारी निवासस्थान दुरूस्तीच्या कामासाठी स्थानिक कामगार वसाहतीत दाखल झाले. त्यांनी छत दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. ज्या निवासस्थानाचे छत पूर्णत: उडाले आहे, अशा निवासस्थानाला नवीन टीन शेड लावण्यात येणार आहेत.महिलांनी डीएफओंची घेतली भेटलोकमतने वृत्त प्रकाशित करताच वसाहतीमधील काही महिलांचे शिष्टमंडळ आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक सी.आर. तांबे यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. वनकर्मचारी निवासस्थानाचे छत वादळाने उडाल्यामुळे निवाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून अशा निवासस्थानात वास्तव्य करणे धोकादायक बनले आहे, अशी आपबिती महिलांनी त्यांना सांगितली. वनकर्मचारी वसाहतीतील निवासस्थान दुरूस्तीच्या कामात दिरंगाई होत असल्याची तक्रार महिलांनी त्यांच्याकडे केली. यावर काही तांत्रिक सोपस्कार लवकरात लवकर पार पाडून सदर निवासस्थान दुरूस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात येईल, असे आश्वासन तांबे यांनी महिलांना दिले.
निवासस्थान दुरूस्तीचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:06 AM
१६ मे रोजी आलापल्लीसह परिसराला वादळाचा जोरदार तडाखा बसला होता. या वादळामुळे वनविभागाच्या वसाहतीतील अनेक घरांचे छत उडून गेले. मागणी करूनही या छताची दुरूस्ती होत नव्हती.
ठळक मुद्देवनकर्मचारी वसाहतीत कामगार दाखल : नवीन टीन शेड बसविणार; वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी घेतली दखल