गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी नगर परिषदेतील कंत्राटी सफाई कामगारांनी आज बुधवारी पहाटे गडचिरोलीतील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. त्यांना खाली उतरविण्याचे प्रयत्न सुरू आहे.
कंत्राटदाराने ९ एप्रिल २०२१ रोजी ४ महिन्याचे पेमेंट न करता ५० कामगारांना कामावरून कमी केले होते. हे कामगार ६ वर्षांपासून काम करीत होते. परत कामावर घ्यावे म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केल्यानंतर कंत्राटदाराने पुन्हा कामावर घेण्याचे मान्य केले. पण ५ महिने झाले तरी अद्याप काहीच केले नाही.
आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी या कामगारांपैकी २३ जणांनी भल्या पहाटे गडचिरोलीतील पाणी पुरवठ्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलपणे मला या प्रकरणात लक्ष घालायला वेळ नाही, माझ्या ऑफिससमोर उपोषण करू देणार नाही, असे म्हटल्याचा आरोप या कामगारांनी केला. ठाणेदार अरविंदकुमार कतलाम, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख छाया कुंभारे यांनीही त्या कामगारांना खाली उतरण्याचे आवाहन केले आहे.