राेजगार व इतर कारणांसाठी ग्रामीण भागातील नागरिकांचा शहराकडे ओढा वाढत चालला आहे. त्यामुळे शहरातील जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यातूनच शासकीय, खासगी जमिनीवर अवैधपणे कब्जा करून तिची परस्पर विक्री करणे यासारखे प्रकार वाढत चालले आहेत. राज्यातील माेठ्या शहरांच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यात याचे प्रमाण कमी असले तरी ते वाढत चालले आहे. काही नागरिक तर शासकीय जमीन स्वत:ची आहे, असे सांगून तिची परस्पर विक्री करीत आहेत. यातून भांडणतंट्यांचे प्रकार वाढीस लागत आहे. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी पाेलीस विभागाकडे स्वतंत्र शाखा व पथक असणे आवश्यक आहे. काही नागरिक प्लाॅटशी संबंधित तक्रारी पाेलीस ठाण्यामध्ये दाखल करतात. मात्र, पाेलीस या तक्रारीची अदखलपात्र अशी नाेंद घेतात. तसेच गुन्हा दाखल केला तरी त्यांच्याकडून न्याय मिळण्याची शक्यता फारच कमी असते. पाेलीस ठाण्याच्या पाेलिसांकडे फाैजदारी गुन्ह्यांच्या तपासाचा भार अधिक असतो. त्यामुळे ते दिवाणी प्रकरणातील गुन्ह्यांकडे लक्ष देऊ शकत नाहीत. आपल्याला शासनाकडून पट्टा मिळाला आहे असे सांगून काही नागरिक घरांसाठी जागा विकत आहेत. विशेष म्हणजे पट्टा मिळालेली जमीन विकता येत नाही. यात घेणारा व विकणाराही दाेषी आहेे. अवैध पद्धतीने नाेटरी केली जाते. हा धंदा गडचिराेली शहरात तेजीत आहे. यातून सरकारची जमीन विकणारे कराेडपती बनले आहेत.
भूखंडांच्या भाववाढीबराेबरच वादही वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 4:43 AM