पुनर्वसन कागदावरच : मतदार यादीतून नाव कमी करण्याचे संकेत देसाईगंज : चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील जुनी लाडज या गावात १९८०-८१ मध्ये आरमोरी तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले होते. त्यावेळी जुनी लाडज येथील ३९५ कुटुंबाना ९९९ हेक्टर जागा सावंगीजवळ देऊन नवे लाडज वसविण्यात आले. मात्र आपल्या जुन्या व नव्या गावातूनही येथील नागरिक सरकारी योजनांचा लाभ घेत आहे. अलीकडेच डोंगा दुर्घटनेनंतर ही बाब प्रशासनाच्याही निदर्शनास आली असून गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए. एस. नायक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गडचिरोलीच्या व्यतीरिक्त इतर जिल्ह्यातून लाडजचे नागरिक लाभ घेत असतील तर त्यांची नावे गडचिरोली जिल्ह्याच्या मतदार यादीतून कमी करण्यात येईल, असे सुतोवाच केले आहे. चंद्रपूर, गडचिरोली हा संयुक्त जिल्हा असताना १९८०-८१ मध्ये लाडजला पावसाळ्यात बेटाचे स्वरूप येते म्हणून तेव्हा आरमोरी तालुक्यात त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. ३९५ कुटुंबाला ९९९ हेक्टर जागा सावंगी गावाजवळ देण्यात आली. येथे शासनाने त्यांना सर्व सोयीसुविधा पुरविल्या. मात्र पुनर्वसनात मिळालेली जागा ही खडकाळ असल्याने अनेकांनी आपली वडिलोपार्जीत जागा, शेती जुन्या लाडजमधून सोडलेली नव्हती. नव्या लाडजमध्येही रहिवासी मालकी असलेल्या नागरिकांनी जुन्या लाडजची सुपीक जमीन कायमच ठेवली. पूर आला की, स्थानांतरित होण्यास यांचा कायम नकार राहत होता. त्यामुळे या भागात नेहमीच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी लागत असे. पुनर्वसन केल्यानंतर जुन्या जागेवर कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ नये, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र जुनी लाडज याला अपवाद ठरले आहे. जुने गाव व पुनर्वसित गाव हे वेगवेगळ्या जिल्ह्यात येत असल्याने दरवेळी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाकडून जुन्या लाडजमध्ये सोयीसुविधा पुरविल्या जात असे व नवीन लाडजला गडचिरोली जिल्ह्यातून सोयीसुविधा मिळत होत्या. या लाडजचे नागरिक दोन्ही जिल्ह्याचे पाहुणे झाले व सरकारी योजनांचा लाभही दोन्ही ठिकाणाहून घेत आहेत. १२ जुलैला पुराच्या काळात १२ लोकांना घेऊन येणारा डोंगा वैनगंगेच्या पात्रात उलटला. १० जणांना वाचविण्यात यश आले. दोघांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. मात्र या दुर्घटनेने प्रशासनासमोर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. लाडज घटनेच्या बचाव कार्याची माहिती घेण्यासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी आले असता त्यांना ही बाब प्रकर्षाने जाणवली. त्यानंतर त्यांनी येथील नागरिक दोन ठिकाणचा लाभ घेत असतील, तर त्यांची नावे गडचिरोलीच्या मतदार यादीतून वगळावे लागतील, असे संकेत दिले आहे. एकूणच लाडजवासीयांना आता कुठल्याही एकाच भागात राहण्यासाठी प्रशासनाला बाध्य करावे लागणार आहे. त्याशिवाय झालेल्या पुनर्वसनालाही अर्थ उरणार नाही व दरवेळी पावसाळ्यात अशा घटना घडत राहतील व प्रशासनाला डोकेदुखी वाढत राहील. अनेकांना आपल्या जिवाला मुकावे लागेल. त्यामुळे या प्रश्नावर गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)
दोन्ही भागातून लाडजवासीय घेतात सोयीसुविधांचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2016 1:47 AM