लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचा नववा दीक्षांत समारंभ येत्या १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्ष चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.राज्यपाल कोश्यारी हे सोमवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी गडचिरोलीत पोहोचतील. दि.१२ ला सकाळी एमआयडीसी परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्यावतीने आयोजित गुजरातपर्यंतच्या सायकल रॅलीचा राज्यपालांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला जाणार आहे. त्याचदिवशी सकाळी गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.पालकमंत्री शिंदे दि.११ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते दि.१२ रोजी सकाळी सीआरपीएफच्या कार्यक्रमाला राज्यपालांसोबत उपस्थित राहणार आहेत. तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभालाही उपस्थित राहणार आहेत. दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ऑक्सिजन एल.एम.ओ. प्लान्ट आणि पी.एस.ए.प्लान्टच्या उद्घाटन सोहळ्यास तसेच रुग्णवाहिका वाटप कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पालकमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ४ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चव्हाण हे १२ रोजी सकाळी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर दुपारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोलीमधील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.
गडचिरोली भेटीदरम्यान दि.११ ला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी चातगाव येथील ‘सर्च’ संस्थेच्या शोधग्रामला सदिच्छा भेट देणार आहेत. आदिवासी व ग्रामीण जनतेची आरोग्य सेवा, संशोधन तसेच दारू-तंबाखू मुक्तीसाठी केल्या जाणाऱ्या कार्याची माहिती जाणून घेतील तसेच डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांची भेट घेऊन त्यांच्या उपक्रमांची माहिती घेतील. त्यासाठी शोधग्राममध्ये राज्यपालांच्या स्वागताची तयारी सुरू आहे.