लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी परिचारीकांची पदाचे सुसूत्रीकरण करण्याचे पत्र आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक डॉ. संजीव कुमार यांनी काढले आहे. सुसूत्रीकरणामुळे जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक कंत्राटी एएनएमची नोकरी धोक्यात येणार आहे. त्यामुळे कंत्राटी परिचारीका या परिपत्रकाविरोधात आंदोलन छेडणार आहेत, अशी माहिती संघटनेचे पदाधिकारी परमानंद मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.सुसूत्रीकरणाच्या धोरणानुसार उपकेंद्रात नियमित परिचारीकेचे पद रिक्त असल्यास कंत्राटी परिचारीका असावी. बिगर आदिवासी उपकेंद्राची लोकसंख्या ७ हजार ५०० व आदिवासी उपकेंद्राची लोकसंख्या ५ हजार असल्यास कंत्राटी एएनएम असावी. वर्षभरात किमान ३६ प्रसुती होणे आवश्यक आहे. उपकेंद्र मुख्यालयापासून शेवटच्या गावाचे अंतर २० किमीपेक्षा जास्त असल्यास कंत्राटी एएनएम असावी. हे निकष पूर्ण न करणाऱ्या उपकेंद्रात कंत्राटी एएनएम कार्यरत असेल तर अशा अतिरिक्त एएनएमची यादी सेवाज्येष्ठतेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर करावी. २०११ च्या जनगणनेनुसार १० हजार लोकसंख्येला एक एएनएम याप्रमाणे आवश्यक व रिक्त पदे जाहीर करावी, असे परिपत्रकात म्हटले आहे. या निकषानुसार गडचिरोली जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक कंत्राटी परिचारिकांची नोकरी धोक्यात येणार आहे. त्यामुळे या परिपत्रकाला तीव्र विरोध असून आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेला संघटनेच्या अध्यक्ष शर्मिला जनबंधू, भावना लाजुरकर, अमिता नागदेवते, रतन शेंडे, माया सिरसाट आदी उपस्थित होते.
सुसूत्रीकरण धोरणाने कंत्राटी परिचारिकांची नोकरी धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 11:42 PM
राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी परिचारीकांची पदाचे सुसूत्रीकरण करण्याचे पत्र आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक डॉ. संजीव कुमार यांनी काढले आहे. सुसूत्रीकरणामुळे जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक कंत्राटी एएनएमची नोकरी धोक्यात येणार आहे.
ठळक मुद्देआंदोलन करणार : परमानंद मेश्राम यांची माहिती