लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कुठल्याही आपत्तीत लोकांचा सहभाग असेल तर त्यावर मात करणे शक्य होते. आरोग्याशी निगडित असलेली कोरोनाच्या आपत्तीचे निवारण करतानाही लोकांचा सहभाग घेणे गरजेचे आहे; मात्र याबाबतीत अजूनही सरकारकडून १८९७ मध्ये प्लेगच्या महामारीच्या वेळी बनविलेल्या कायद्यानुसारच आपत्ती निवारणाचे धोरण ठरविले जाते. हे धोरण पांगळे असून त्याऐवजी जास्तीत जास्त लोकांचा सहभाग ठेवून या आपत्तीवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असा विश्वास समाजशास्राचे अभ्यासक तथा लेखक डॉ.मिलिंद बोकिल (पुणे) यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या दोन लाटांमधील परिस्थितीचा अभ्यास करून त्यांचे मूल्यांकन डॉ.बोकिल यांनी केले. त्यावरील निष्कर्ष सविस्तरपणे तयार करून ते शासनाला सादर करत असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेचे संचालक डॉ.सतीश गोगुलवार, स्वीस एड इंडिया संस्थेच्या प्रमुख कविता गांधी (पुणे), ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा उपस्थित होते.कोविडनंतर मानसिक आजारांना तोंड देत असलेल्या नागरिकांना आधार देण्याची गरज कविता गांधी यांनी व्यक्त केली.यावेळी पत्रकार परिषदेला प्रामुख्याने सृष्टी संस्थेचे केशव गुरनुले, प्रा.बारसागडे, संगीता तुमडे, मनोहर हेपट, सविता सादमवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
ब्रिटिशकालिन धोरणानुसार निर्बंध कशासाठी?- देशात कोरोनाची साथ नियंत्रणासाठी १८९७ च्या ब्रिटिशकालीन जुलमी कायद्यानुसार व्यवस्थापन केले जात आहे. त्यात स्थानिक पातळीवर कसे नियोजन करायचे यावर कोणतेच निर्देश नाही. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी शासनाचे धोरण पांगळे ठरत असल्याची टीका यावेळी डाॅ.बोकिल यांनी केली. - कोरोनाकाळात गावपातळीवर दक्षता समित्या नेमल्या. पण त्यात केवळ पदाधिकारी घेतले, सामान्य नागरिकांचा सहभाग असल्यास त्या समित्या अधिक चांगल्या पद्धतीने काम करतील, असे ते म्हणाले.
कुरखेडा-कोरची तालुक्यात मदत- यावेळी डॉ.गोगुलवार यांनी सांगितले की, कोरानापीडित कुटुंबांवर खूप वाईट परिस्थिती उद्भवली. त्यामुळे त्यांना आर्थिक आणि मानसिक आधार देण्यासाठी आम्ही आमच्या आरोग्यासाठी, स्वीस एड, स्वीस सॉलिडरिटी या संस्थांच्या वतीने कुरखेडा आणि कोरची तालुक्यात अनेक कुटुंबांना रोख स्वरूपात, किराणा साहित्य, औषधी याशिवाय मास्क, सॅनिटायझर, थर्मामीटरसारखे साहित्य दिले. संस्थेने नागरिकांमध्ये केलेल्या जागृतीमुळे कुरखेडा तालुका लसीकरणात जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत पुढे असल्याचे ते म्हणाले.