लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप दिवसागणिक वाढत असताना कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा डोस घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. पण, आता ज्या मध्यम वयोगटातील नागरिकांना ही लस दिली जात आहे त्यांच्यात मद्यशौकिनांचे प्रमाणही बरेच आहे. कोरोनाची लस जास्त परिणामकारक ठरण्यासाठी लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर काही दिवस मद्यप्राशन टाळणे गरजेचे आहे. असे असताना मद्यशौकिनांपुढे आधी कोरोनाला दूर सारायचे की दारूला? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दारूबंदी असतानाही गडचिरोली जिल्ह्यात दारू आणि दारूड्यांना रोखणे अशक्य आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने जिल्ह्यात दारूची आयात होतेच. याशिवाय जिल्ह्याच्या अनेक भागात चालणाऱ्या हातभट्ट्या कितीही उद्ध्वस्त केल्या तरी त्या जागा बदलून पुन्हा लागतातच, हा अनेक दिवसांचा अनुभव आहे. त्यामुळे मद्य आणि मद्यपी यांचे या जिल्ह्यात अतूट असे नाते आहे. काही लोकांना तर दिवसभरात एकदा तरी दारूचा पेग घेतल्याशिवाय चैन पडत नाही. अशा लोकांना कोरोनाचा डोस देणे आणि हे करताना त्यांना दारूपासून दूर ठेवणे मोठे आव्हान ठरत आहे.डॉक्टरांच्या मते कोरोनाची लस घेण्याच्या काही दिवस आधी आणि काही दिवस नंतर मद्यप्राशन करणे टाळावे. त्यामुळे कोरोना लसीचा योग्य परिणाम साधणे शक्य होते. जीवघेण्या कोरोनाला दूर ठेवण्यासाठी शौकिन लोक आता दारूला काही दिवसासाठी का होईना, दूर सारतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
देशी, विदेशी दारूसह हातभट्ट्यांवर कारवाया जिल्ह्यात छत्तीसगड, मध्यप्रदेशात वापरली जाणारी हलक्या दर्जाची देशी दारू येते. याशिवाय विशिष्ट ब्रॅण्डची विदेशी दारूही आयात होते. तसेच हातभट्टीच्या दारूसाठी मोहफूल सडवून त्याचे रसायन तयार केले जाते. मार्च महिन्यातील कारवायांवर नजर टाकल्यास देशी - विदेशी हातभट्टी दारूसह मोठ्या प्रमाणात हातभट्टीचा सडवाही ठिकठिकाणच्या कारवायांमध्ये जप्त करण्यात आला. एप्रिल महिन्यात या कारवायांमध्ये अजून भर पडत असल्याचे दिसून येते. अशा कितीही कारवाया झाल्या तरी मद्यशौकिन आपला शौक पूर्ण केल्याशिवाय राहात नाहीत.
लस घेण्याच्या किमान दोन दिवस आधी आणि लस घेतल्यानंतर दोन दिवस मद्यप्राशन करणे टाळले पाहिजे. कारण लसीमुळे मिळणारे औषध आणि मद्य प्राशनातून शरीरात जाणारे रासायनिक द्रव यांच्यात काही रासायनिक प्रक्रिया होऊ शकते. मद्यप्राशन केल्यास लसीनंतर शरीरावर झालेला परिणाम नेमका लसीमुळे झाला की, मद्यप्राशनामुळे हे लक्षात येणे कठीण होईल.- डॉ. शशिकांत शंभरकरजिल्हा आरोग्य अधिकारी
कोरोनाची लस घेतल्यानंतर किमान ७२ तास तरी मद्यप्राशन वर्ज्य करावे. नियमित मद्यप्राशन करणाऱ्याला तसे न केल्यास चिडचिडपणा किंवा इतर काही लक्षणे दिसतात. अशा लोकांसाठी कोरोनाचे लसीकरण हे आव्हानच आहे. पण, कोरोनाला दूर सारणे आधी महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी त्यासाठी सहकार्य करून लस घ्यावी.- डॉ. बागराज धुर्वेनिवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय