सद्य:स्थितीत जिल्ह्यात २१६८ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यातील गडचिरोली शहर आणि परिसरातील ८९६ रुग्ण असून, उर्वरित १२७२ रुग्ण जिल्ह्याच्या इतर ग्रामीण भागांतील आहेत. म्हणजे ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. विशेष म्हणजे अनेक जण रुग्णालयात थांबण्याऐवजी गृह विलगीकरणाचा पर्याय निवडत आहेत; पण हे करताना आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याऐवजी बिनधास्तपणे बाहेर पडत आहेत. त्यातून कोरोना पसरत आहे.
गावांमध्ये नियंत्रण नाही
- गेल्या वर्षी गावात एखादा रुग्ण निघाला तरी त्याचे घर आणि परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून तिकडे जाण्यास मनाई केली जात होती. आता तसे होत नसल्यामुळे कुठे कोण रुग्ण आहे हे कळतच नाही.
- स्वत:च्या घरी सर्व नियम पाळून राहण्याची हमी देणारे रुग्ण बाहेर पडतात. त्यांच्या संपर्कात आलेले लोकही मग पॉझिटिव्ह होऊन कोरोनाबाधितांची संख्या वाढवितात.
- आरोग्य कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी त्यांच्या संपर्कात राहून सूचना करणे गरजेचे असते; पण त्यात सातत्य नसल्यामुळे रुग्ण अनियंत्रित होतात.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नाही
- एखादा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तो कोणाकोणाच्या संपर्कात आला याचा शोध घेणे गरजेचे असते. म्हणजे तो पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आला होता का, हेसुद्धा कळू शकते.
- रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर तो नजीकच्या काळात कोणाच्या संपर्कात आला होता याचा शोध घेतल्यास त्या रुग्णापासून कोणाला कोरोनाची बाधा झाली असू शकते हे शोधणे सोपे जाते.
- परंतु अशा पद्धतीने संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची टेस्ट करणे, विलगीकरणात ठेवणे याकडे ग्रामीण भागात फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे कोरोना पसरत आहे.