गडचिरोली : जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनो विषाणूचा संसर्ग गडचिरोली जिल्ह्यात अद्याप कोणालाही झालेला नाही. मात्र कोरोनोबाधित देशांमधून परतलेले २१ जण सध्या गडचिरोली जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात आहेत. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून संभाव्य धोका टाळण्यासाठी त्यांना १४ दिवस लोकसंपर्कापासून दूर (होम कॉरंटाईन) पण आपल्या घरातच राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
कोरोनाबाधित दुबई, चीन, अमेरिका, बाकू अशा वेगवेगळ्या देशातून पर्यटन व इतर कारणांसाठी जाऊन आलेल्या या नागरिकांची विदेशातून आल्यानंतर वैद्यकीय चाचणी झाली. हे लोक कोरोनाबाधित नसल्याचा वैद्यकीय अहवाल आला आहे. पण पुढील काही दिवस कोरोनाच्या विषाणूचा संभावित धोका लक्षात घेता त्यांना १४ दिवस लोकांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले. हे लोक गडचिरोली शहरासह कुरखेडा, मुलचेरा आणि इतर काही तालुक्यांमधील रहिवासी आहेत. पण त्याबाबत अधिक माहिती देण्यास वैद्यकीय सूत्रांनी नकार दिला आहे.
सदर नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. तसेच कुठल्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये आणि कोरोनो प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ३० नुसार व कलम ५१ नुसार शासकीय कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाने त्यांना सूचित केले आहे.