गडचिरोली : जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा 23 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाले. हे सर्व व्यक्ती बाहेरील जिल्हा व राज्यातील रहिवासी आहेत. यामध्ये 22 जवान सीआरपीएफ बटालियनचे तर 1 जण भंडारा जिल्ह्यातील असून ती व्यक्ती नोकरीनिमित्त रुजू होण्यासाठी भामरागड येथे दाखल झाली होती. त्या सर्व 23 जणांना जिल्ह्यात आल्यानंतर क्वारंटाईन केले होते. सीआरपीएफ जवानांना कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे तर भामरागड येथील व्यक्तीला भामरागडमध्येच संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते.या सर्व रुग्णांना आता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. असे असले तरी सर्वच रुग्ण बाहेरील राज्य व जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांच्या नोंदी त्या-त्या जिल्ह्यात तसेच राज्यात करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंतची एकुण बाधित संख्या ७३ च राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. २३ पैकी ७ नोंदी राज्यस्तरावरून मंजूर झाल्याने त्या-त्या जिल्ह्यात शिफ्ट केलेल्या आहेत. उर्वरीत नोंदी शिफ्ट करणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.सीआरपीएफचे 23 जवान सुटीवर होते ते नागपूरवरून 27 जूनला सीआरपीएफच्या बसने जिल्ह्यात आल्यानंतर संस्थात्मक विलगीकरणात दाखल झाले. यातील 23 पैकी 18 पॉझिटीव्ह आढळले तर 5 निगेटीव्ह आले आहेत. तसेच 4 इतर जवान खाजगी वाहनाने इतर जिल्ह्यातून आले होते. त्यांचेही अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यानुसार 23 पैकी 18 व 4 पैकी 4 असे 22 सीआरपीएफ जवान शनिवारी रात्री कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे.
23 कोरोनाबाधितांचे ठिकाण व संख्या पश्चिम बंगाल -10, उत्तर प्रदेश-2, कर्नाटक -2, ओरीसा-2, झारखंड -1, बिहार -1, अकोला -1, नांदेड -2, चंद्रपूर -1 आणि भंडारा -1