गडचिरोली - ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे आणि पुत्र अनिकेत आमटे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबतची माहिती सोमवारी रात्री समोर आली आहे. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांनी चाचणी करून घेतली होती. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प चालवण्यात येतो. प्रकाश आमटे आणि त्यांचे कुटुंबीय हे हेमलकसा येथे वास्तव्यास असतात. तसेच प्रकाश आमटे यांचे पुत्र अनिकेत आमटे हे लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक म्हणून काम पाहत आहेत.दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासांत नव्या 3075 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आज 40 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 75767 पर्यत खाली आला आहे. तसेच आज 7345 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आतापर्यंत 47 हजार 639 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 1730715 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज दिवसभरातील कोरोनाबाबत दिलासादायक बाब म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून 92 टक्क्यांवर स्थिरावलेला कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढून अखेर 93.98 टक्क्यांवर पोहचला आहे. त्याचप्रमाणे गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 40 पर्यत खाली आल्याने राज्यासाठी हे चांगले संकेत मानले जात आहेत.
coronavirus: प्रकाश आमटेंच्या पत्नी मंदाकिनी आणि पुत्र अनिकेत यांना कोरोनाचा संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 11:30 PM