दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २१ आॅक्टोबर रोजी गडचिरोलीसह लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया घेण्यात येणार आहे. निवडणूक व पोलीस प्रशासनाने गडचिरोली येथील एसटीच्या विभागीय कार्यालयाकडे १५० बसगाड्यांची मागणी केली असून या बसगाड्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. १५० बसगाड्यांच्या वाहतुकीतून विभागीय कार्यालयाला जवळपास १८ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त होणार आहे. निवडणुकीच्या कालावधीत तीन ते चार दिवस विभागीय कार्यालयाला तिनही आगारातील काही बसफेºया रद्द कराव्या लागणार आहे.राज्य परिवहन महामंडळ बहुतेक वेळा तोट्यात असते. मात्र सणासुदीच्या कालावधीत तसेच निवडणुकीच्या दरम्यान एसटीला मोठी मागणी असल्याने महामंडळाला मोठा आर्थिक नफा हात असतो. एसटीच्या गडचिरोली विभागीय कार्यालयाअंतर्गत अहेरी, गडचिरोली, ब्रम्हपुरी असे तीन आगार आहेत. या तिन्ही आगाराच्या १५० बसगाड्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात निवडणुकीच्या कामासाठी जाणार आहेत. निवडणूक विभागाने ९० व पोलीस विभागाने ६० एसटी बसगाड्या आरक्षित केल्या आहेत.गडचिरोली जिल्ह्यात दळणवळण सुविधांचा अभाव असलेल्या ग्रामीण भागात एसटी हा उत्तम पर्याय आहे. मतदान केंद्रावरील नियुक्त कर्मचारी व प्रशासकीय साहित्याच्या वाहतुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाने व पोलीस विभागाने एसटी महामंडळाकडे १५० बसगाड्यांची मागणी नोंदविली आहे. गडचिरोली विभागीय कार्यालयाच्या वतीने मतदान प्रक्रियेसाठी या बसगाड्या प्रशासनाला पुरविण्यात येणार आहे. मतदानाच्या एकदिवसापूर्वी म्हणजे २० आॅक्टोबर रोजी या बसगाड्या निवडणूक व पोलीस विभागाकडे रवाना होणार आहेत. निवडणूक विभागाकडे दोन दिवस व पोलीस विभागाकडे या बसगाड्या पाच ते सहा दिवस राहणार आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम व नक्षल प्रभावित आहे. अशा भागातून तालुका व जिल्हा मुख्यालयी पोलिंग पार्ट्या परत येण्यासाठी विलंब होत असतो. त्यामुळे बसगाड्या दोन ते तीन दिवस प्रशासनाकडे राहणार आहे. निवडणूक मतदान प्रक्रियेच्या कालावधीत दिवाळी सणासाठी काही प्रवाशी प्रवास करू शकतात. मात्र याच कालावधीत महामंडळाच्या बसगाड्या आरक्षित असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. कारण गडचिरोली विभागीय कार्यालयाच्या वतीने अहेरी, ब्रह्मपुरी व गडचिरोली आगाराच्या काही बसफेºया दोन दिवस रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र प्रमुख मार्गावरील बस वाहतूक प्रभावित होणार नाही, अशी दक्षता विभागीय कार्यालयाच्या वतीने घेण्यात येईल, असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले.मानव विकासच्या बसगाड्या वापरणारविधानसभा निवडणुकीच्या कामासाठी गडचिरोली आगाराच्या ३८, अहेरी आगाराच्या २३ व ब्रह्मपुरी आगाराच्या सर्वाधिक ९९ बसगाड्या वाहतुकीवर राहणार आहेत. अशा स्थितीत नेहमीची प्रवाशी वाहतूक प्रभावित होऊ शकते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मानव विकास मिशनच्या बसगाड्या चालविण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी शाळा, महाविद्यालयासह सर्वांना शासकीय सुटी असल्याने या कालावधीत प्रवाशी वाहतूक अधिक राहणार नाही, तरी सुद्धा मानव विकास मिशन बसगाड्यांच्या माध्यमातून प्रवाशांना बस वाहतुकीची सुविधा देण्यात येणार आहे. गडचिरोली आगाराकडे एकूण १०० बसगाड्या असून यामध्ये मानव विकास मिशनच्या ५९ व साध्या ५१ बसगाड्या आहेत.लोकसभा निवडणुकीतून मिळाले होते ३६ लाख२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर या लोकसभा क्षेत्रातील मतदान प्रक्रियेसाठी गडचिरोली एसटी विभागीय कार्यालयाकडे शेकडो बसगाड्यांची मागणी करून बसगाड्या आरक्षित केल्या होत्या. निवडणूक प्रशासन व पोलीस विभागांना महामंडळाने या बसगाड्या पुरविल्या. या बसगाड्याच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीदरम्यान एसटीच्या गडचिरोली येथील विभागीय कार्यालयाला तब्बल ३६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
निवडणुकीमुळे महामंडळाला १८ लाखांचे उत्पन्न मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 6:00 AM
दिलीप दहेलकर । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : २१ आॅक्टोबर रोजी गडचिरोलीसह लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया ...
ठळक मुद्देकाही बसफेऱ्या रद्द होणार : गडचिरोली विभागीय कार्यालयाच्या १५० बसगाड्यांचे बुकिंग