जिल्ह्यातील कापूस उत्पादकांची व्यथा : सिरोंचा, मुलचेरा, अहेरी, चामोर्शी तालुक्यात उत्पादनगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात खासगी कापूस व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना परप्रांतात आपला कापूस विकावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र अहेरी, सिरोंचा भागात सुरू करावे, अशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रमुख पीक धान असले तरी जिल्ह्याच्या अहेरी उपविभागासह चामोर्शी तालुक्यात अनेक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून कापसाचे पीक घेत आहे. यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर येण्याची आशा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आहे. गडचिरोली जिल्ह्यात ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस आता दसरा ते दिवाळीच्या दरम्यान निघण्यास सुरुवात होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पाच-सात वर्षांपासून कापसाचा पेरा सातत्याने वाढत आहे. सिरोंचा भागात उच्च प्रतीचा कापूस उत्पादीत केला जातो. जिल्ह्यात उत्पादन होणारा कापूस गडचिरोली जिल्ह्यात खरेदीदार नसल्यामुळे शेतकऱ्यांना बाहेर ठिकाणी नेऊन विकावा लागतो. अनेक शेतकरी हिंगणघाट, आदिलाबाद वा तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात नेऊन विकतात. गडचिरोली जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जिल्ह्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र केंद्र सरकारने सुरू करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. धर्मरावबाबा आत्राम पालकमंत्री असताना २००८ मध्ये सिरोंचा येथे कापूस पणन महासंघाचे अस्थायी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. तर मध्यंतरीच्या काळात पांढुर्णा येथून व्यापाऱ्यांना बोलावून अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीने कापूस खरेदी केंद्र सुरू केले होते. या केंद्रांवर शेतकऱ्यांच्या मालाची मोठी आवकही त्यावेळी झाली होती. परंतु सरकारच्या उदासीनतेमुळे कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात आले. यावर्षी कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. पाकिस्तानसह इतर देशात कापूस उत्पादनात घट आली आहे व सुताचे भाव मोठ्या प्रमाणावर पडल्याने खासगी सुतगिरण्यांची कापूस खरेदी राज्यात सर्वत्र बंद राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील कापूस उत्पादकांची मोठी अडचण निर्माण होणार आहे. खासगी व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी शेतकऱ्यांकडून करू शकतात, अशी शक्यता असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुरूंगवासाची भीती व्यापाऱ्यांना दाखविली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कापूस खरेदीसाठी कुठुनच व्यापारी येत नाही. त्यामुळे या भागात केंद्र सरकारने कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया (सीसीआय) चे कापूस खरेदी केंद्र अहेरी, सिरोंचा भागात सुरू करावे, अशी मागणी या भागातील कापूस उत्पादकांनी केली आहे. खा. अशोक नेते यांनी या प्रश्नावर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंतीही कापूस उत्पादकांनी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र स्थायी स्वरूपात सुरू झाल्यास पुढील वर्षांपासून कापूस पेरा वाढण्याची शक्यता निर्माण होईल.
कापूस निघण्यास सुरुवात, खरेदी केंद्राचा पत्ता नाही
By admin | Published: October 19, 2016 2:20 AM