लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मागील खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या वर्षी १ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीन तर १८ हजार हेक्टरवर कापसाचा पेरा झाला होता. आठ हजारहून अधिक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली होती. शासनाने आता सरसकट अनुदान देण्याची घोषणा केली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या खरिपात २ लाख १० हजार हेक्टरवर पेरा झाला होता. त्यात सर्वाधिक १ लाख ८० हजार हेक्टरवर धान पीक होते. कापसाची लागवड १८ हजार हेक्टवर झाली होती.
मतदीसाठी ई- पीक पाहणीची अट रद्द मागील वर्षी कापूस व सोयाबीन उत्पादकांनी आपल्या पिकांची ई- पीक पाहणी केली असेल तरच त्यांना हेक्टरी ५ हजार रुपयांचा लाभ दोन हेक्टरच्या मर्यादत १० हजार रुपयांपर्यंत देण्याचे शासनाने जाहीर केले होते; परंतु आता ही अट रद्द करण्यात आली आहे.
हेक्टरच्या मर्यादेत अशी होणार मदत वाटप सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर त्यापेक्षा अधिक क्षेत्रासाठी आणि २ हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.