लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अवघ्या ६ महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या येथील इंदिरा गांधी चौकातील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात बाळंत झालेल्या महिलेच्या पोटात तब्बल १७ दिवस कापसाचा बोळा राहिल्याचा प्रकार उघडकीस आला. रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे असह्य वेदना सहन करीत त्या महिलेने कसेतरी दिवस काढले. अखेर मंगळवारी (दि.३०) तिला पुन्हा रुग्णालयात भरती केल्यानंतर त्या महिलेवर पुन्हा उपचार सुरू करण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, कन्हेरी टोली येथील माहेर असलेल्या कांती शिवकुमार शर्मा ही पहिल्या बाळंतपणासाठी राजस्थानमधील आपल्या सासरवरून माहेरी आली होती. गेल्या १० आॅक्टोबर रोजी तिला प्रसवकळा सुरू झाल्यानंतर रुग्णवाहिकेने जिल्हा महिला व बाल रुग्णालयात आणण्यात आले. पण सायंकाळपर्यंत तिच्या वेदनांकडे तेथील कर्मचाऱ्यांकडून लक्ष दिले जात नव्हते, असा आरोप पीडित महिलेसह गडचिरोली आदिवासी नारी संघटनेच्या सदस्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन रुग्णालयातील कारभाराची माहिती दिली.पीडित महिला कांती हिने आपली आपबिती सांगितली. दि.१० ला दिवसभर होत असलेल्या वेदना पाहून आई लालनी नैताम हिने तेथील महिला वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लक्ष देण्याची वारंवार विनंती केली पण त्यांनी आईसोबत असभ्य व्यवहार केल्याचे कांती हिने सांगितले. अखेर सायंकाळी ६ वाजता आशा वर्करने प्रसुतीगृहात नेले. त्यानंतर ७.५० ला प्रसुती झाली. मात्र त्यानंतर टाके न घालताच तेथील परिचारिका दुसºया प्रसुतीच्या कामात लागली. त्यादरम्यान बराच रक्तस्त्राव झाला.दोन दिवसानंतर रुग्णालयात सुटी झाल्यानंतर कांती आपल्या आईकडे गेली असता तिच्या कोथ्यामध्ये सतत वेदना होत होत्या. पण बाळंतपणामुळे वेदना होत असेल असे समजून तिने त्या सहन केल्या. मात्र त्यानंतर लघवी होणेही बंद झाले. त्यामुळे कांतीने खाणे-पिणेही सोडले. त्यादरम्यान दि.२७ ला तिला कापसाचा तुकडा शरीराबाहेर येत असल्याचे जाणवले. त्यामुळे कन्हेरीच्या नर्सला बोलविले असता बाळंतपणादरम्यान टाके लावताना कांतीच्या ओटीपोटात कापसाचा बोळा राहिल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्या नर्सने बँडेजने गुंडाळलेला तो कापसाचा बोळा बाहेर काढला.तब्बल १७ दिवस कापसाचा पोटात राहिल्याने कांतीला प्रकृती चांगलीच बिघडली. तिला बसणेही अवघड झाले आहे. अशा स्थितीतही तिच्या नातेवाईकांसह आदिवासी नारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिला पत्रकारांपुढे आपबिती सांगितल्यानंतर पुन्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर लगेच डॉ.जयंत पर्वते यांनी उपचार सुरू केले. सोनोग्राफी करून पोटात अजून एखादा तुकडा राहिला का, याचीही शहानिशा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.चौकशी समिती नियुक्तआरोग्य कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झालेला हा प्रकार गंभीरच असून हे कसे झाले, त्यासाठी कोण आणि कसे जबाबदार आहे हे तपासण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नेतृत्वात चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असून त्यानुसार संबंधितावर कारवाई केली जाईल, असे महिला व बाल रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.डी.के.सोयाम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.संबंधितांवर कारवाई कराबाळंतपणादरम्यान महिलेच्या शरीरात कापसाचा बोळा किंवा कोणतीही बाह्यवस्तू राहणे हा संबंधित आरोग्य कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणाच आहे. जीवाशी खेळणारा हा प्रकार भविष्यात कोणाशीही घडू नये यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पीडित कांती शर्मा हिच्यासह तिची आई लालनी नैताम तसेच गडचिरोली आदिवासी नारी संघटनेच्या सुलोचना मडावी, भारती मडावी, डॉ.देवीदास मडावी, लक्ष्मी कन्नाके, जयश्री येरमे, रेखा तोडासे, नेहा गेडाम, कविता मेश्राम, रोहिणी मसराम, ममता कडपते आदींनी पत्रपरिषदेतून केली.कर्मचाऱ्यांवर दुप्पट ताण१०० खाटांच्या या रुग्णालयात मंजूर असलेली तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाºयांची पदे भरलेली असली तरी त्यांच्यावर कामाचा दुप्पट ताण आहे. १०० ची क्षमता असताना दररोज २०० पेक्षा जास्त रुग्ण भरती असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून आपली ड्युटी करताना हेळसांडपणा होत आहे. या रुग्णालयात येणाऱ्या महिला व बाल रुग्णांची संख्या पाहता रुग्णालयाचा विस्तार करून २०० खाटांचे रुग्णालय करण्याची आणि त्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे बोलले जाते.
बाळंत महिलेच्या पोटात कापसाचा बोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:56 AM
अवघ्या ६ महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या येथील इंदिरा गांधी चौकातील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात बाळंत झालेल्या महिलेच्या पोटात तब्बल १७ दिवस कापसाचा बोळा राहिल्याचा प्रकार उघडकीस आला.
ठळक मुद्देआरोग्य कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा : महिला व बाल रुग्णालयातील प्रकार