अहेरी : स्वतंत्र अहेरी जिल्ह्याची निर्मिती करून अधिकचे तालुके निर्माण करावे, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन अहेरीचे अपर जिल्हाधिकारी यांचेमार्फत पाठविण्यात आले आहे. गडचिराेली जिल्ह्याचा विस्तार अतिशय माेठा आहे. अहेरी, सिराेंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा या तालुक्यांमध्ये नागरिकांना जिल्हास्थळी जाणे कठीण हाेते. त्यामुळे शासकीय याेजनांचा लाभ घेताना अडचण निर्माण हाेत आहे. शासनाच्या अनेक याेजना दुर्गम भागात अजूनपर्यंत पाेहाेचल्या नाहीत. त्यामुळे अहेरी उपविभागातील जनता अजूनही विकासापासून वंचित आहे. विकासाला गती देण्यासाठी अहेरी जिल्ह्याची निर्मिती हाेणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून लढा दिला जात आहे. मात्र शासनाने अजूनही लक्ष दिले नाही. अहेरी भागाची गरज लक्षात घेऊनच अहेरीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय, पाेलीस उपमुख्यालय, उपजिल्हा रुग्णालय व प्रशासकीय यंत्रणेची अनेक कार्यालये आहेत. अहेरी जिल्ह्याची निर्मिती करून कमलापूर, जिमलगट्टा, आसरअल्ली, पेरमिली, आष्टी, जारावंडी हे तालुके निर्माण करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ तलांडे, कायर्कारी अध्यक्ष विलास रापर्तीवार, प्रा.नागसेन मेश्राम, रवी भांदककार, प्रशांत जाेशी, छत्रपती गाेवर्धन, सतीश आत्राम, रमेश आईंचवार, अतुल भिंगारू आदी उपस्थित हाेते.
अहेरी जिल्हा निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:28 AM