गावकऱ्यांची बैठक : १०० किमीचे अंतर ग्रामीण जनतेला तुडवावे लागते कमलापूर : अहेरी तालुका मुख्यालयापासून ४६ किमी अंतरावर अतिदुर्गम भागात असलेल्या कमलापूरला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी कमलापूर तालुका संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, राज्यपाल व जिल्हाधिकाऱ्यांकडे उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कमलापूर तालुका संघर्ष समितीने नवीन तालुका निर्मितीबाबत शासनाकडे वारंवार निवेदने सादर केली आहेत. तत्कालीन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी २००१ साली व तत्कालीन खासदार नरेश पुगलिया यांनी ३१ जानेवारी २००२ ला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. मात्र यावर कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. कमलापूर हे गाव अहेरी तालुका मुख्यालयापासून ४६ किमी अंतरावर आहे. भौगोलिकदृष्ट्या अहेरी तालुका खूप विस्तारलेला आहे. अहेरी तालुका मुख्यालयापासून दुर्गम भागातील ग्रामपंचायती १०० किमी अंतरावर आहेत. या भागामध्ये कोणतेही उद्योगधंदे नाहीत. यामुळे येथील नागरिकांची उपजिविका केवळ शेतीच्या भरवशावर चालते. सिंचनाच्या सोयींचा अभाव असल्याने शेतीही निसर्गावरच अवलंबून आहे. अनेक वर्षांपासून पावसाचा लहरीपणा सुरू असून शेतकरी नापिकीमुळे हवालदील झाला आहे. लोकांमध्ये अशिक्षितपणा दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय व निमशासकीय कामे करून घेण्यासाठी तालुका मुख्यालयी दोन - दोन दिवस मुक्कामी रहावे लागते. तरीही कामे होत नाहीत. उलट आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. अनेक शासकीय योजनांपासून नागरिकांना वंचित रहावे लागत आहे. गावे तालुका मुख्यालयापासून दूर अंतरावर असल्याने या गावांमध्ये कोणत्याही विभागाचे अधिकारी भेट देत नाहीत. यामुळे योजनांचा पुरेपूर फायदा होत नाही. कमलापूर परिसरातील २० ग्रामपंचायतीमधील नागरिकांना कमलापूर हे गाव सोयीचे आहे. परिसरातील ५ किमीच्या आतील खेड्यातील लोकसंख्या १५ हजारांच्या जवळपास असून कमलापूर व्यतिरिक्त इतर गावांची संख्या कमी आहे. यामुळे कमलापूर येथे तालुका निर्मिती केल्यास नागरिकांना शासनापर्यंत लवकर पोहचता येईल. या बाबीची दखल घेऊन कमलापूरला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.(वार्ताहर) जिमलगट्टा तालुका निर्मिती रखडली जिमलगट्टा : अहेरी व सिरोंचा या दोन्ही तालुकास्थळापासून जिमलगट्टा गावाचे अंतर सुमारे ६० किमी आहे व इतर गावांचे अंतर १०० पेक्षा अधिक किमी असल्याने जिमलगट्टाला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून मागील १५ वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. जिमलगट्टाचा परिसर आदिवासीबहुल अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. जिमलगट्टा येथे मंडळ कार्यालय असून या कार्यालयाची वास्त निर्माणधीन आहे. या परिसरात एकूण ६५ गावांचा समावेश होतो. जिमलगट्टा परिसरात देचलीपेठा, उमानूर, मरपेली, दामरंचा या अतिदुर्गम भागातील जनतेला तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी फार मोठी अडचण होते. या भागात वाहतुकीची साधने अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे या गावांमधून अहेरी या तालुकास्थळी जाऊन पुन्हा त्याच दिवशी परत येणे शक्य होत नाही. त्यामुळे या परिसरातील बहुतांश नागरिक दाखलेच काढत नसल्याची गंभीर स्थिती आहे. परिणामी अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. येथील तालुका संघर्ष समितीने तालुका निर्मितीसाठी अनेकदा चक्काजाम आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा जिमलगट्टा येथे उपलब्ध आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, मंडळ कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, वन विभागाचे कार्यालय, वन विकास महामंडळ, शाळा, महाविद्यालयेसुद्धा आहेत. जिमलगट्टा तालुका म्हणून घोषित केल्यास. परिसरातील जवळपास ३० ते ४० हजार जनतेला प्रशासकीय लाभ मिळण्यास मदत होईल. (वार्ताहर)
कमलापूर तालुका निर्माण करा
By admin | Published: December 30, 2016 1:52 AM