गडचिरोली : अनेक वर्षांपर्यंत या जिल्ह्यातील ओबीसी बांधवांवर आरक्षणाच्या बाबतीत अन्याय झाला, हे खरे आहे. देशात आणि राज्यात ओबीसींच्या आरक्षणाचा इतिहास महात्मा फुले, शाहू, आंबेडकरांपासून फार जुना आहे. आता राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये ओबीसींचे आरक्षण वाढविण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्याचे श्रेय माझ्या एकट्याचे नसून महाआघाडीतील सर्वच पक्षांच्या नेत्यांचे आहे, असे प्रांजळ मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना. छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. (Credit for OBC reservation goes to leaders of all parties; Bhujbal's candid opinion in the gratitude ceremony)
राज्य सरकारच्या ओबीसी आरक्षणासाठी गठित अभ्यास समितीचे ना. भुजबळ अध्यक्ष होते. त्यामुळे सोमवारी गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषदेच्या वतीने कृतज्ञता सोहळ्यात त्यांचा माजी राज्यमंत्री, आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना भलामोठा पुष्पहार घालून आदिवासींची बांबूपासून बनविलेली पारंपरिक टोपी आणि तिर-कमान (धनुष्यबाण) भेट देण्यात आली.
यावेळी बोलताना ना. भुजबळ म्हणाले, २०११ च्या जनगणनेत ओबीसींची गणना व्हावी यासाठी समता परिषद न्यायालयात गेली. भाजप नेते गोपीनाथ मुंडे हेसुद्धा ओबीसी गणनेच्या बाजूने होते. १०० खासदार जाऊन भेटले. प्रणव मुखर्जींनी ओबीसी गणना करण्याचे जाहीरही केले; पण पुढे सोशियो-एकॉनॉमिक सर्व्हे झाला. नंतर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला त्या डेटाचे विश्लेषण करायचे होते; पण ५ वर्षे त्या कमिटीवर सदस्यच नेमले नाहीत. २०१७ मध्ये एक गृहस्थ न्यायालयात गेले आणि त्यावर स्थगनादेश आला. ओबीसींच्या बाबतीमधील इम्पिरिकल डेटा मिळालाच नाही. आता त्यासाठी पुन्हा आम्ही कोर्टात जाणार आहोत, असे ते म्हणाले.
वेगवेगळ्या केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये असलेले आरक्षण २०१७ मध्ये अचानक बंद केले. त्यामुळे २५ हजार विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप भुजबळांनी केला.
यावेळी आ. धर्मरावबाबा यांनी ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम करण्याचा विचार करावा. त्याशिवाय ओबीसी समाज सक्षम होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्राचार्य अशोक जीवतोडे, बापूसाहेब भुजबळ, महाज्योतीचे संचालक दिवाकर गमे, राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे, माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, माजी आ. हरिराम वरखडे, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
१९८५ चे आणि आताचे गडचिरोली यात खूप फरक
यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देताना भुजबळ यांनी आपण शिवसेनेत असताना १९८५ मध्ये पहिल्यांदा गडचिरोलीत आलो होतो. त्यावेळी गडचिरोली खूपच लहान होते. चौकाच्या कॉर्नरला सभा घेतली होती. त्यानंतरही गडचिरोलीत दौरे झाले; पण आताचे आणि त्यावेळचे गडचिरोली यात भरपूर फरक दिसल्याचे ते म्हणाले.
माजी आमदार वरखडे राष्ट्रवादीत
यावेळी शिवसेनेचे आरमोरीचे माजी आमदार हरिराम वरखडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. गेल्या वर्षी त्यांनी ना. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ब्रह्मपुरी येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर सोमवारी गडचिरोलीत राष्ट्रवादीचा दुपट्टा घातला. त्यांचे जावई भूषण खंडाते यांना समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बनविण्यात आले.