विहीरगाव येथे जवळपास सात ते आठ अवैध दारूविक्रेते सक्रिय आहेत. या गावाच्या माध्यमातून जिल्हा मुख्यालयासह परिसरातील इतर गावांना सुद्धा मोहफुलाची दारू पुरविली जाते. या गावासह येवली बिटातील बहुतांश गावात अवैध दारूविक्री केली जाते. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. विहीरगाव येथे अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती गाव संघटनेने मुक्तिपथ तालुका चमूला दिली. त्यानुसार गडचिरोली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या दोन दारूविक्रेत्यांच्या घराची झडती घेतली असता प्रत्येकी १५ लिटरप्रमाणे दोन्ही घरातून ९ हजार रुपये किमतीची एकूण ३० लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. संपूर्ण मुद्देमाल जप्त करीत एका महिलेसह दोघांवर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस हवालदार शिवदास दुर्गे, पोलीस शिपाई अरविंद सिडाम यांनी केली. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते.