लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या एकूण उत्पादनात भर पडण्याचा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या खरीप हंगामापासून पूर्वीच्या पीकस्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करून नव्याने ही स्पर्धा राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून अनेक प्रयोग करण्यात येतात. उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गाैरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन उत्पादन वाढीस मदत मिळू शकते, या अनुषंगाने ही स्पर्धा घेण्यात येत आहे.या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी विहीत नमुन्यात अर्ज भरून प्रवेश शुल्क, सातबारा व केवळ आदिवासी शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र जाेडून भाग घ्यावा. पीकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.रब्बी हंगाम २०२० मध्ये पीकस्पर्धेसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याप्रमाणे, खरीप हंगाम २०२१ साठीही जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करून पीकस्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.शेतकऱ्यांना विविध प्रयाेग करण्यासाठी प्राेत्साहित करणाऱ्या या पीक स्पर्धेमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढला असून अनेक शेतकरी वेगवेगळे प्रयाेग करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत आहेत.
अशी आहे शेतकरी गट विभागणीसर्वसाधारण गटासाठी १० व आदिवासी गटासाठी ५ अशी तालुकानिहाय स्पर्धकसंख्या निश्चित केली आहे. पीकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांच्या शेतावर त्या पिकाखाली किमान १० आर. क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणी प्रयोगासाठी सर्वसाधारण गटासाठी ५ व आदिवासी गटासाठी ४ अशी किमान संख्या आहे.
स्पर्धेसाठी ११ पिकांचा समावेशपीकस्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल आदी ११ पिकांचा समावेश स्पर्धेसाठी करण्यात आला आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. सर्व गटांसाठी पीकनिहाय ३०० रुपये प्रवेश शुल्क लागणार आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल पिकासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत आहे.
चार स्तरांवर मिळणार बक्षीसपीकस्पर्धेत सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका स्तरावर प्रथम बक्षीस ५ हजार, द्वितीय बक्षीस ३ हजार, तृतीय २ हजार, जिल्हा स्तरावर प्रथम बक्षीस १० हजार, द्वितीय बक्षीस ७ हजार, तृतीय ५ हजार, विभाग स्तरावर प्रथम बक्षीस २५ हजार, द्वितीय बक्षीस २० हजार, तृतीय १५ हजार तर राज्य पातळीवर प्रथम बक्षीस ५० हजार, द्वितीय बक्षीस ४० हजार व तृतीय बक्षीस ३० हजार रुपये दिले जाणार आहेत.