बुधवारपासून सुरुवात : लाखोंची उपस्थितीजिमलगट्टा : तेलंगणा राज्यातील जागृक देवस्थान म्हणून समजल्या जाणाऱ्या समक्का-सारक्का देवीच्या जत्रेला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. या जत्रेला दरदिवशी गडचिरोली जिल्ह्यातील तसेच राज्यातील हजारो भाविकांचे जत्थे जात आहेत. मेडाराम हे यात्रास्थळ तेलंगणा राज्यातील वरंगल जिल्ह्यामध्ये येते. वरंगल जिल्हा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे सिरोंचा, अहेरी, एटापल्ली या तालुक्यांमधील हजारो भाविक याठिकाणी जात आहेत. लाखो भाविकांच्या उपस्थितीने समक्का-सारक्का जत्रास्थळ फुलून गेले आहे. १४ व्या दशकात त्या भागात पगडीद्ध महाराज नावाचा राजा होता. तो जनतेवर अन्याय करीत होता. तेव्हा देवाने भूतलावर लहान मुलीच्या रूपाने समक्का देवीला पाठविले, अशी आख्यायिका सांगितली जाते. सदर जत्रा दर दोन वर्षांनी भरत असल्याने भक्तगण या जत्रेची वाट बघत राहतात. पूल झाल्यानंतर महाराष्ट्रातील भाविकांची आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
मेडारामच्या जत्रेत राज्यातील भाविकांची गर्दी
By admin | Published: February 13, 2016 12:55 AM