लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : प्रकाशाचा, आनंदाचा आणि खऱ्या अर्थाने घरात ‘लक्ष्मी’चे आगमन झाल्याने, उत्साहाचा सण असणाऱ्या दिवाळीसाठी सर्वच स्तरांतून खरेदीसाठी लगबग सुरू आहे. दिवाळी सणाची सुरुवात साेमवारपासून झाली असून, आठवडाभर हा सणाची लगबग राहणार आहे. धनत्रयोदशीला वस्तू खरेदीचे विशेष महत्त्व असल्यामुळे मंगळवारी गडचिरोलीसह जिल्हाभरातील बाजारपेठेत विविध वस्तुंच्या खरेदीची एकच लगबग सुरू होती. विशेषत: सुवर्णालंकार खरेदी करण्यासाठीही गडचिरोलीत गर्दी झाल्याचे दिसून आले. वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस हाेय, तर त्यानंतर धनत्रयाेदशी, लक्ष्मीपूजन, गाेवर्धनपूजन व भाऊबीज असा हा क्रम आहे. या सणानिमित्त विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी आबालवृद्धांसह साऱ्यांचीच गडचिराेलीच्या बाजारात मंगळवारला प्रचंड गर्दी केली होती. ग्राहकांच्या गर्दीमुळे त्रिमूर्ती चाैक परिसर फुलून गेला हाेता. बाजारपेठेच्या मार्गावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत होती. दिवाळी सणानिमित्त गेल्या ८ ते १० दिवसांपासून गडचिराेली शहराच्या सर्व भागांतील बाजारपेठ विविध साहित्यांनी सजली आहे. त्रिमूर्ती चाैक, मुख्य बाजारपेठ, सराफा बाजारपेठ, तसेच चामाेर्शी, आरमाेरी, धानाेरा व मूल या प्रमुख मार्गावरील दुकानांमध्ये दिवाळी सणाला लागणारे विविध साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. याशिवाय पाेटेगाव बायपास राेड, शिवाजी महाविद्यालय राेड, गाेकुलनगरकडे जाणाऱ्या मार्गावरही दुकाने सजली आहेत. फुटपाथवर गृहसजावटीचे विविध साहित्य, तसेच मातीच्या पणत्या, आकाशदिवे आदी साहित्य आहे.दिवाळी सण म्हटला की, रुचकर व स्वादिष्ट फराळ आलाच. हे फराळ बनविण्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची किराणा दुकानात गेल्या आठवडाभरापासून गर्दी आहे, याशिवाय दिवाळी सणानिमित्त कपडे, फटाके आदी वस्तूंची खरेदीही जोमात सुरू आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुवर्णपूजनासाठी अनेक नागरिकांनी सराफा दुकानात जाऊन साेन्याच्या दागिन्यांची खरेदी केली. गडचिराेलीच्या कापड बाजारात तर सध्या पाय ठेवायलाही जागा नसल्याचे दिसून आले.
कॅटरर्स व्यावसायिक वळले फराळ विक्रीकडेदिवाळी सणानिमित्त फराळ खाण्यावर सर्वांचाच भर असताे. मात्र, धावपळीच्या युगात अनेक सधन व श्रीमंत कुटुंबीय तयार झालेला (रेडीमेट) फराळाचे पदार्थ खरेदी करतात. हे पदार्थ घरी नेऊन मित्रमंडळी व आप्तेष्टांना खाऊ घालतात. गडचिराेली शहरातील काही कॅटरर्स व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेला आपले दुकान सजवून फराळाचे विविध पदार्थ विक्रीसाठी ठेवले आहेत. याशिवाय स्वीट मार्टच्या दुकानातही फराळाचे पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. चकली, शेव, चिवडा, माेतीचूर लाडू, बेसनाचे लाडू, तसेच गाेड पदार्थ उपलब्ध आहेत.
रांगाेळी खरेदीसाठी महिलांसाठी गर्दीशहरातील माेठ्या दुकानांसह फुटपाथवरील दुकानात विविध रंगाच्या रांगाेळी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या शिवाय अनेक जण हातगाडी फिरवून रांगाेळी विकत असल्याचे दिसून येत आहे. गडचिराेली शहरात पांढऱ्यासह विविध रंगाच्या रांगाेळीचा भाव १६ ते २० रुपये किलाे असा आहे. काही दुकानांत १५ रुपये तर काही दुकानांमध्ये २० रुपये किलाे दराने रांगाेळी विकली जात आहे.