( प्रदीप बोडणे) ज्या काळात हवामानाचा अंदाज देणारी यंत्रणा नव्हती त्याकाळात पक्ष्यांचे आवाज आणि पावसाळ्यापूर्वी झाडावर बांधत जाणारी कावळ्यांची घरटी कोणत्या स्वरूपात बांधली यावरून शेतकरी पावसाचे अंदाज व्यक्त केले जात आणि ते खरे ठरत. पण आता मानवी हस्तक्षेपामुळे पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून पावसाचे संकेत देणारे कावळ्याचे घरटे दुर्मिळ झाले आहेत.
पावसाळा सुरू होण्याच्या एक महिन्यांपूर्वी कावळ्यांचा विणीचा हंगाम असतो. या काळात नर, मादी झाडावर गोलाकार घरटी बांधायला सुरुवात करतात. जर कावळ्याने झाडाच्या मधोमध मोठ्या फांद्याला धरून घरटी बांधली तर त्या वर्षात वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाचे संकेत मिळत. कावळ्याने झाडाच्या टोकाला घरटी बाधली तर त्या वर्षात पर्जन्यवृष्टी कमी होणार, असा अंदाज व्यक्त केला जात असे आणि कावळ्याच्या घरट्यात वरून बांधले जाणारे पावसाचे अंदाज खरी ठरायचे. ग्रामीण भागात तर कावळे घरटी बांधतेवेळी काडी तोंडात कशी धरतात यावरूनही पावसाचे अंदाज व्यक्त केल्या जात असे. जर कावळ्याने काडी चोचीत मधोमध धरली तर मधले नक्षत्र भरपूर बरसणार असे संकेत बांधले जात. जर कावळ्याने चोचीत काळी टोकावर धरली तर या वर्षात सुरुवातीला पाऊस नाही, शेवटचे नक्षत्र बरसणार असा अंदाज व्यक्त केला जात असे.
पक्ष्यांना हवामानाचे ज्ञान उपजत असते. पानकोंबडी, पावश्या, मोर या पक्ष्यांच्या पावसापूर्वीच्या ओरडणे वरून पाऊस येणार असल्याचे संकेत मिळत. रोहिणी नक्षत्र सुरू झाला की जून महिन्याच्या प्रारंभापासून पक्षी जोरात जोरात ओरडून एकमेकांचा पाठलाग करताना दिसतात. या विणीच्या हंगामात नर, मादीची घरटी बांधण्याची लगबग हे पावसाचे संकेत देते. पण पक्ष्यांची होणारी अवैध शिकार आणि वृक्षतोडीमुळे पक्ष्यांची संख्या घटली. कावळ्याची काव..काव.. चिमणीची चिव. चिव. मोराचा..केका पहाटेच्या समयी परसबागेत ऐकायला येणारे पक्षांचे मंजुळ स्वर मुक्त झाले.
दिवसेंदिवस बेसुमार होणारी वृक्षतोड यामुळे हवामानातील उष्माचे प्रमाण वाढल्याने जंगली पक्ष्यांचे प्रमाण कमी होत आहे. पक्ष्यांची संख्या कायम ठेवण्यासाठी पर्यावरणपूरक विकास व्हायला हवा नाहीतर पक्षी नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. भविष्यात आपल्याला पावसाचे प्रतिकूल-अनुकूल बदलाचे संकेत देणारे पक्ष्यांचे आवाज आणि कावळ्याची घरटी केवळ पुस्तकात पाहायला मिळतील.