लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पाच बटालियन कार्यरत आहेत. त्यांच्याकडून नक्षली कारवाया रोखण्यासोबतच आता नागरी कृती कार्यक्रमातून सामाजिक उपक्रमही राबवून गोरगरीब आदिवासींना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या वर्षभरात यावर १ कोटी ३० लाख रुपये खर्च झाले आहेत.बेरोजगार, महिलांना रोजगार-स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यासोबतच इतरही उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यात दुर्गम भागात नक्षली कारवाया रोखण्यासोबतच नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचेही आव्हान आहे. रोजगाराची साधने नसल्यामुळे बेरोजगार युवक नक्षल चळवळीकडे भरकटू शकतात. हे टाळण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलही नागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांच्या उत्थानासाठी पुढे येत आहे. वर्षभरापूर्वी या उपक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते झाले होते.जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात कार्यरत सीआरपीएफच्या पाचही बटालियनकडे जबाबदारी देऊन कुठे काय करता येईल याची आखणी करण्यात आली. बेरोजगार युवक, नागरिक, महिला यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे स्वयंरोजगार, रोजगारासाठीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यात कॉम्प्युटर प्रशिक्षण, वाहन चालक प्रशिक्षण, महिलांसाठी शिवणकाम प्रशिक्षण आणि शिलाई मशीनचे वाटप, याशिवाय बकरीपालन, कुकुट पालन, मच्छीपालन यासाठीही मदत केली जात आहे. सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ.टी.शेखर यांनी सांगितले की, या कार्यक्रमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. महिला आणि युवकांना स्वयंरोजगारासाठी मदत मिळाली आहे.१० गावांत जलस्त्रोतांचे संवर्धनजिल्ह्यातील १० गावांमध्ये जलस्त्रोत वाढविण्यासाठी तलावांचे खोलीकरण आणि इतर आवश्यक त्या सुविधा देण्यात आल्या आहेत. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने त्या तलावांमध्ये पुरेसे पाणी साचले असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
सामाजिक उपक्रमातही सीआरपीएफचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:50 AM
नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पाच बटालियन कार्यरत आहेत. त्यांच्याकडून नक्षली कारवाया रोखण्यासोबतच आता नागरी कृती कार्यक्रमातून सामाजिक उपक्रमही राबवून गोरगरीब आदिवासींना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ठळक मुद्देनागरी कृती कार्यक्रम : रोजगार-स्वयंरोजगार प्रशिक्षणावर १ कोटी ३० लाख रुपये खर्च