गडचिरोली : गेल्या आठवडाभर सतत हिंसक कारवाया करणा-या नक्षलवाद्यांनी रविवारी रात्री पोलीस दलाच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत एक जवान शहीद, तर दोन जवान गंभीर जखमी झाले. ही घटना गॅरापत्ती पोलीस मदत केंद्रांतर्गत पडियलमेट्टा जंगल परिसरात रात्री साडेआठच्या सुमारास घडली. मंजुनाथ जक्कनवार (३१) असे शहीद जवानाचे नाव असून, तो कर्नाटक राज्यातील रिहवासी आहे. या घटनेत लोकेशकुमार व दीपक शर्मा (दोघेही उत्तरप्रदेश) हे जवान जखमी झाले.शुक्रवार २४ नोव्हेंबरला नक्षल्यांच्या भूसुरुंग स्फोटात हवालदार सुरेश गावडे हे शहीद झाले, तर सोनल खेवले व विकास धात्रक हे जवान जखमी झाले. त्या घटनेची शाई वाळत नाही तोच नक्षल्यांनी रविवारी रात्री पुन्हा एका जवानाचा बळी घेतला. धानोरा, कोरची तालुक्यात पोलिसांकडून अतिरिक्त कुमक पाठवून नक्षलशोध मोहीम सुरू केली होती. रविवारी कुरखेडा उपविभागांतर्गत पोमके ग्यारापत्ती हद्दीतील मौजा पडियलमेट्टा जंगल परिसरात ग्यारापत्ती पोस्टची तुकडी आणि सीआरपीएफकडून संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबविले जात होते. यादरम्यान सायंकाळी सातच्या सुमारास पोलीस व नक्षल यांच्यात चकमक उडाली. यावेळी पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. मात्र त्याच जंगलात रात्री साडेआठच्या सुमारास पुन्हा नक्षल्यांनी पोलिसांवर हल्ला करीत फायरिंग केली. त्यात जक्कनवार शहीद झाले.पोलीस दलाला हादराआठवडाभरात नक्षल्यांनी धानोरा तालुक्यात ३ नागरिकांची हत्या केली, तर २ जवान शहीद झाले. या घटनेमुळे पोलीस दलाला हादरा बसला आहे.
सीआरपीएफचा जवान नक्षली हल्ल्यात शहीद, दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 5:30 AM