तालुक्यात दिना जलाशयासह लहान मोठ्या तलावाच्या साहाय्याने सिंचन सुविधा निर्माण करण्यात आली. येथील शेतजमीन धान पिकासाठी उत्तम असल्याने खरीप हंगामात धान पिकाचे उत्पादन हमखास होत असते. कृषी विभागाच्या नियोजनानुसार, तालुक्यातील चामोर्शी, कुनघाडा, येणापूर्, आष्टी, घोट परिसरात यावर्षी धान ३२ हजार हेक्टर, कापूस पाच हजार हेक्टर, तूर बांधावर दोन हजार हेक्टर, तर सलग क्षेत्रामध्ये ५० हेक्टर, इतर कडधान्य व गळीत धान्य ३०० हेक्टर, भाजीपाला १०० हेक्टर क्षेत्रात लागवड केली जाणार असून, सोयाबीन १०० हेक्टरमध्ये संपूर्ण सोयाबीन पेरणी ही बीबीएफ पद्धतीद्वारे करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पेरीव धान लागवड धान शेती वर हवामान बदलाचा फार मोठा परिणाम दिसून येतो. चिखलणी योग्य पाऊस उपलब्ध न झाल्यामुळे धान रोपांचे पऱ्हे अवस्था मध्येच वय वाढते व ३० दिवसांपेक्षा जास्त वयाची धानाची रोपे लागवड केल्यामुळे उत्पादन कमी होते. अशा वेळी पेरीव धान एक उत्तम पर्याय आहे. पेरीव धानामुळे चिखलणी व रोवणी करणे, रोपे खोदणे, पेंड्या पसरविणे, नर्सरी पोसणे, आदी कामावरील खर्च कमी करता येतो. शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिके पेरणीकरिता जमीन लवकर उपलब्ध होते. कमी पर्जन्यमान असताना वेळेवर पेरणी करता येईल व त्यामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल. कमी मजूर व कमी खर्चात लागवड करता येईल, तर शेतामध्ये शेणखत व हिरवळीच्या खताचा वापर करावा असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. धान पिकामध्ये युरिया, डीएपी ब्रिकेटचा वापर करावा, तसेच रासायनिक खते योग्य वेळी योग्य प्रमाणात द्यावे. कीड रोगाच्या नियंत्रणकरिता बांधीत उतरून पिकाची पाहणी करावी कीड रोगाचा प्रादुर्भाव आढळून येताच कृषी विभागाचा सल्ला घ्यावा. यावर्षी सोयाबीन पेरणी बीबीएफ पद्धतीद्वारे करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे .
बॉक्स
बीबीएफ तंत्रज्ञानाचे फायदे
बीबीएफ पेरणी यंत्राच्या साहाय्याने उतारास आडवी पेरणी केल्याने मूलस्थानी जलसंधारण होते. बीबीएफमुळे आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून अधिक उत्पन्न मिळते. पावसात खंड पडल्यास अथवा पाणी कमी असल्यास या पद्धतीमुळे वरंब्यावर ओलावा टिकून ठेवला जातो. पिकाला पाण्याचा ताण कमी पडत नाही. पाऊस जास्त झाल्यास या पद्धतीमधील सरीमधून अतिरिक्त पाणी बाहेर पडते. मुबलक हवा, सूर्यप्रकाश मिळाल्याने पिकांची जोरदार वाढ होते. किडरोगास पीक बळी पडत नाही. सोयाबीन पेरणीसाठी २० ते २५ टक्के बियाणे कमी लागते. पाण्याची बचत होते. उत्पन्नामध्ये २० ते ३० टक्के हमखास वाढ होते. पिकांची आंतरमशागत करणे, पीक मोठे झाल्यावर सरीमधून औषध फवारणी करणे. आवश्यकता भासल्यास स्प्रिंकलरद्वारे संरक्षित पाणी देण्यासाठी ही पेरणी पद्धत फायदेशीर ठरते.
बॉक्स -
पेरणीपूर्व मशागतीचे काम आटाेपले
शेतकरी साधारणपणे जमिनीत ओलावा आल्यावर धान पेरण्या करीत असतात. सध्या शेतातील पेरणीपूर्व मशागती काम आटोपण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यात मुखत्वे रोवणी पद्धतीने धान पिकांची लागवड केली जाते. त्यासाठी शेतकरी धान पऱ्हे टाकत असतात. अशा परिस्थितीत बरेच शेतकरी आपल्याजवळ असलेल्या बियाण्याची पेरणी करीत असले तरी अधिक उत्पन्न होईल या आशेने संकरित वाणाचे बियाणे घेऊन लागवड करीत आहेत. रोवणी कामाची शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली दिसून येत आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी तालुक्यात २९०० हेक्टरवर धान पऱ्ह्याची पेरणी करण्यात आली असून, रोवणीच्या कामास सुरुवात होत आहे, अशी माहिती चामोर्शीचे तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी दिली.