लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : तालुक्यातील सोनसरीजवळील जंगल देव डोंगराच्या पायथ्याशी सिंहावर आरूढ असलेली दुर्गा मातेची मूर्ती दिसून आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाला असून या मूर्तीच्या दर्शनासाठी शनिवारी नागरिकांची रांग लागली होती. एवढेच नव्हे तर आमदार कृष्णा गजबे यांनी सुध्दा मूर्तीचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली.डोंगराच्या पायथ्याशी आढळून आलेली मूर्ती तीन फूट उंचीची आहे. सदर मूर्ती अखंड आहे. दगडावर कोरीव काम करून मूर्ती बनविण्यात आली असल्याचे दिसून येते. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील विजय मोहुर्ले यांच्या स्वप्नात दुर्गा माता आली. मोहुर्ले यांनी दिलेल्या माहितीनुसारच देलनवाडी येथील नागरिकांनी सोनसरी गाठून डोंगराच्या पायथ्याशी शोध घेतला असता, मूर्तीचा मुकूट निदर्शनास आला. यानंतर गावातील नागरिकांनी दिंडी व भजन आणले. जवळ असलेल्या पवित्र जलाचा शिडकाव केला असता, मुकूटाचा भाग वरती येण्यास सुरूवात झाली. मूर्ती पूर्णपणे बाहेर निघाल्यानंतर नागरिकांनी पूजा-अर्चा केली, अशी माहिती सोनसरीचे सरपंच दादा प्रधान, शालिकराम हरडे, ज्ञानेश्वर प्रधान, भारत राऊत, श्रीकांत दहिकर, जयंत प्रधान, मुरली दहिकर यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.त्यानंतर नागरिकांनी अभिषेक करीत त्याच ठिकाणी मूर्तीची स्थापना केली. शनिवारी शेकडो भाविकांनी मूर्तीचे दर्शन घेतले. नवरात्रीनंतर मूर्तीची प्रतिष्ठापणा डोंगरावर उंच ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती उपस्थित गावकºयांनी दिली आहे.मूर्तीचे निरिक्षण केले असता, प्रथमदर्शनी मूर्ती पुरातन वाटते. सदर मूर्ती दीर्घकाळापासून नैसर्गिकरित्या जमिनीत गाडली गेली असावी. पावसाच्यापाण्यामुळे कालांतरारने या मूर्तीवरील माती वाहून गेल्याने सदर मूर्ती उघडी पडली असण्याची शक्यता आहे. किंवा कुणी तरी अगोदरच मूर्ती जमिनीत गाडून ठेवली असावी. जगात चमत्कार कधीच घडत नाही. चमत्कार दाखविणारे आपल्याला सत्यापासून दूर नेतात. अशा प्रकारच्या घटनांवर विश्वास करू नये.- उद्धव डांगे, जिल्हाध्यक्ष, महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मूलन समिती.
जमिनीत सापडलेल्या मूर्तीने वाढविले कुतूहल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 11:10 PM
तालुक्यातील सोनसरीजवळील जंगल देव डोंगराच्या पायथ्याशी सिंहावर आरूढ असलेली दुर्गा मातेची मूर्ती दिसून आली आहे.
ठळक मुद्देसोनसरी येथे आढळली दुर्गा मूर्ती : दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी, आमदारांनीही केली पूजा-अर्चा