अहेरीतील प्रकार : हजार रूपयांचेही सामान ग्राहकाला मिळाले नाही अहेरी : अहेरी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात वाहक पदावर कार्यरत असलेले शिवकांत केंद्रे यांनी टेली शॉपिंगद्वारे मागविलेल्या मालामध्ये अतिशय दुय्यम दर्जाचा माल देऊन त्यांची फसवणूक झाल्याची घटना उजेडात आली आहे. शिवकांत केंद्रे यांना २० दिवसांपूर्वी आम्ही रिबॉक कंपनीतून बोलत असून तुमची लकी कस्टर म्हणून निवड झाली आहे. ६ हजार ९९९ रूपयात तुम्हाला रिबॉक कंपनीचे शूज, ट्रैक सूट, गॉगल, पॉकिट, घड्याळ आणि सॅमसंग गैलक्सी जे सेवन हा मोबाईल मिळेल, अशी बतावणी केली. यावर केंद्रे यांनी आॅर्डर दिला व स्नेहबिहारी टेलिशॉपिंग घंटाघर, उत्तरप्रदेश पिनकोड २०४१०१ या कंपनीकडून शिवकांत केंद्रे यांना २७ डिसेंबर २०१६ ला पार्सल प्राप्त झाले. अहेरी डाक घरात ७ हजार रूपये भरून त्यांनी हे पार्सल सोडविले. पार्सल उघडताच केंद्रे यांची झोप उडाली. कंपनीने सांगितल्या प्रमाणे काहीच सामान मिळाले नाही. वेगवेगळ्या कंपनीचे दुय्यम दर्जाचे काही सामान मिळाले. बॉक्समध्ये मोबाईल मिळाला नाही. रिबॉक कंपनीच्या ऐवजी नोडाबुक लिहिलेले दुय्यम दर्जाचे शूज व इतर सामान मिळाले. कंपनीशी संपर्क केला असता, त्यांचा कॉल लागला नाही. यावरून वाहक केंद्रे यांना आपली फसवणूक झाली हे लक्षात आले. सर्व सामान मिळून एक हजार रूपयांचीही रक्कम पूर्ण होत नाही, असे आढळले. विविध कंपन्यांद्वारे ग्राहकांना कॉल करून आमिष दाखविण्यात येतात. मात्र नागरिक भुलथापांना बळी पडून अशा वस्तू खरेदी करतात. त्यामुळे त्यांची फसवणूक होते. या घटनेने स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)
टेलिशॉपिंगमध्ये ग्राहकाची झाली फसवणूक
By admin | Published: December 28, 2016 3:05 AM