गडचिरोली, धानोरा, येनापूर शाळेतील विद्यार्थिनींना लाभ : शिक्षणात मुलींचा टक्का वाढण्यास मदत गडचिरोली/ धानोरा : मानव विकास योजनेतून गडचिरोली व धानोरा येथील महाविद्यालयात विद्यार्थिनींना सायकलचे वितरण करण्यात आले. गडचिरोली येथील धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयात मानव विकास मिशन योजनेतून इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनींना सायकलचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रदीप घोरपडे होते. इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनींना ४ ते ५ किमी अंतरावरून महाविद्यालयात पायी यावे लागत होते. त्यांना शिक्षणासाठी सुविधा व्हावी, म्हणून विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले. यावेळी समन्वयक प्रा. विजय कुत्तरमारे, सहसमन्वयक प्रा. मनोज बावनकर तसेच प्राध्यापकवृंद , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता नववी ते बारावीत शिकत असलेल्या व बाहेरगावाहून ये- जा करणाऱ्या ४७ मुलींना मानव विकास मिशन अंतर्गत सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष दर्शना उंदीरवाडे, उपाध्यक्ष अन्वरखॉ पठाण, सदस्य नाना पाल, देवनाथ मशाखेत्री, वैशाली मशाखेत्री, कल्पना उईके, कविता मडावी, महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. तुंगीडवार, पर्यवेक्षक आंबेकर आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शिक्षक कोहाडे, साळवे, कडूकर, ठाकूर कोकोडे, नारनवरे आदींनी सहकार्य केले. गडचिरोली जिल्ह्यात सायकल वाटपाची योजना राबविली जात असली तरी दिरंगाई होत असल्याने परीक्षेच्या कालावधीत सायकलचे वितरण होत आहे. (प्रतिनिधी)
शंभरावर विद्यार्थिनींना सायकल वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2017 1:59 AM