गडचिरोली : अज्ञात कारणामुळे घरात लागलेल्या आगीत सिलिंडरचा स्फोट झाला. यानंतर काही वेळेतच संसारोपयोगी साहित्याची राख झाली. सुदैवाने माय- लेक वाचले, पण संपूर्ण घर बेचिराख झाल्याने संसार उघड्यावर आला. ही घटना अहेरी येथील प्रभाग क्र.१२ मध्ये १ जून रोजी सकाळी १० वाजता घडली.
सिंधू सत्यनारायण कटलावार या विधवा असून त्यांना एक मुलगा आहे. सिंधू या इतरांच्या घरी स्वयंपाक बनवून संसार चालवितात तर त्यांचा मुलगा साई हा मजुरीकाम करतो. १ जूनला सकाळी ९ वाजता नित्याप्रमाणे माय-लेक घर बंद करुन आपापल्या कामाला गेले. इकडे त्यांच्या घराला आग लागली. या आगीने काही वेळेतच संपूर्ण घर कवेत घेतले. यात घरातील सिलिंडरच्या टाकीचा स्फोट झाला. काही क्षणात आगीने रौद्र रुप धारण केले. घरातील रोख ५० हजार रुपये, एक तोळे सोने, कुलर, टीव्ही, कपडे, भांडी व इतर दैनंदिन वस्तू जळून खाक झाल्या. घरातून आगीचे लोळ बाहेर पडू लागल्यानंतर शेजाऱ्यांनी आरडाओरड केली. पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला, पण हे प्रयत्न निष्फळ ठरले. नगरपंचायतमधील अग्निशामक दलाचा बंब उशिरा पोहोचला. तोपर्यंत घराची अक्षरश: राख झाली होती. तलाठी कौसर खान,नगरसेवक श्रीनिवास चटारे,चेतन कोकावार यांनी धाव घेतली.
तात्पुरत्या निवाऱ्याची सोयदरम्यान, तलाठी कौसर खान यांनी कटलावार परिवारास नवीन तहसील कार्यालयाजवळ तात्पुरत्या स्वरुपात राहण्याची सोय केली. निवाऱ्याची सोय झाल्याने कटलावार कुटुंबास तात्पुरता दिलासा मिळाला. पंचनामा करुन शासनास अहवाल पाठविण्यात येईल. आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करु, असे तलाठी कौसर खान यांनी सांगितले.