आरमोरी : जखमी अवस्थेत असलेल्या दाेन गव्हाणी घुबडांना वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जीवनदान दिले.
येथील वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून वन्यजीव, साप, जखमी पक्षी यांना पकडून त्यांच्यावर उपचार करून निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवनदान देण्याचे कार्य ही संस्था करीत आहे. आरमोरी येथील संजय गोंधोळे यांच्या घरी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एक पक्षी जखमी अवस्थेत आल्याचे त्याच्या लक्षात येताच त्यांनी वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाने यांना माहिती दिली.
माहिती मिळताच संस्थेचे सचिव दीपक सोनकुसरे, उपाध्यक्ष अंकुश गाढवे आणि सदस्य मंगेश गोंधोळे, करण गिरडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी गव्हाणी घुबडाला ताब्यात घेतले. तो जखमी अवस्थेत असल्याने त्याला उडता येत नव्हते. त्याला आरमोरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.पराते यांनी त्यांच्यावर उपचार करून याची नोंद वनविभाग आरमोरी येथे केल्यानंतर त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.
यापूर्वी आठ दिवसाअगोदर इटीयाडोह प्रकल्पाच्या आरमोरी येथील वसाहतीमधील शेख यांच्या घरी अशा प्रकारचा गव्हाणी घुबड आढळून आला होता. त्याला देखील उपचार करून साेडण्यात आले.