जि.प. सीईओंचा निर्णय : प्रशासनात सुसूत्रता व गती येणारगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामात सूसूत्रता व गतीमानता आणण्यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी जि.प.चा विशेष गुगल ड्राईव्ह तयार करून सर्व विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामांचे नियमित दैनंदिन मूल्यमापन सुरू केले आहे. जि.प.चे सर्वच कंत्राटी कर्मचारी १ आॅक्टोबरपासून रोज सायंकाळी दिवसभर केलेल्या कामांचे विवरण गुगल ड्राईव्हवर अपलोड करीत आहेत. जिल्हा परिषदेंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, मागास अनुदान निधी, सर्व शिक्षा अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, संपूर्ण स्वच्छता विभाग, जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणा, पंचायत विभाग आदींसह विविध विभागात कंत्राटी कर्मचारी १०० पेक्षा अधिक संख्येत कार्यरत आहेत. सदर कर्मचाऱ्यांना पुढील वर्षात पुनर्नियुक्ती देण्यासाठी त्यांनी आदल्यावर्षी केलेल्या कामांचे मूल्यमापन कसे आहे, हे पाहिले जाते. प्रामाणिकपणे १०० टक्के काम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कंत्राटी पदावर पुनर्नियुक्ती दिली जाते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी सप्टेंबर अखेर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामांचे मूल्यमापन नियमित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी १ आॅक्टोबर २०१६ पासून जि.प.च्या सर्व विभागात सुरू करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेच्या गुगल ड्राईव्हमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नाव, पद, रोज केलेल्या कामांचे विवरण आदी तपशील नमूद आहे. कंत्राटी कर्मचारी सायंकाळी सुटीची वेळ झाल्यावर कार्यालयाबाहेर जाण्यापूर्वी या गुगल ड्राईव्हमध्ये दिवसभरात केलेल्या कामांचे विवरण आपले नाव, पदनिहाय नमूद करीत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल हे स्वत: संगणकावर सदर गुगल ड्राईव्हवर कंत्राटी कर्मचाऱ्याने अपलोड केलेल्या कामाचे विवरण पाहतात. यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामात गती आली असून सूसूत्रताही येण्यास मदत होत आहे.जिल्हा परिषदेच्या अनेक विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. शासनाने गेल्या काही वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी भरतीची पध्दत अंमलात आणली आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो कंत्राटी कर्मचारी जि.प.च्या विविध विभागात कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेत नियमित कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामाची भिस्त असल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यासाठी त्यांचे वस्तूनिष्ठ मूल्यमापन तक्ता संबंधित विभाग प्रमुखाने तयार करणे आवश्यक आहे. पुनर्नियुक्तीचे आदेश देताना सदर मूल्यमापन तक्ता अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. सध्या जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामांचे दैनंदिन मूल्यमापन नियमितपणे सुरू आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामात सूसूत्रता व गती येण्यास मदत होईल. सेवेत कार्यरत नियमित कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन होत असते. त्यावरच त्यांची पदोन्नती अवलंबून असते.- शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोलीनियमित कर्मचाऱ्यांचे दैनंदिन मूल्यमापन का नाही?जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामांचे दैनंदिन मूल्यमापन सुरू आहे. यामुळे कामाच्या विवरणाची माहिती अपलोड करण्यास कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळ खर्ची घालावा लागत आहे. नियमित कर्मचाऱ्यांपेक्षा कंत्राटी कर्मचारी अधिक काम करतात, असा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समज आहे. जिल्हा परिषदेच्या नियमित कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामांचे मूल्यमापन का केले जात नाही, असा सवाल जि.प.च्या अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाकडून अल्प वेतन मिळते. उलट नियमित कर्मचाऱ्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना तीन पट वेतन मिळते. अशा स्थितीतही जि.प.चे कंत्राटी कर्मचारी सायंकाळी उशीरापर्यंत कामात व्यस्त असतात. कंत्राटी कर्मचाऱ्यांवर मोठ्या संख्येने दैनंदिन कार्यालयीन कामे सोपविली जात आहेत.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दैनंदिन मूल्यमापन
By admin | Published: November 07, 2016 1:39 AM