लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : नागपूर ते गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून राहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पुलावरील कठडे २०२० मध्ये ऑगस्ट महिन्याच्या महापुरात वाहून गेले. आता दीड वर्षाचा कालावधी लोटूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ते कठडे पुन्हा लावण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे धोकादायक झालेल्या या पुलावरील कठडे पुन्हा सुस्थितीत करण्यासाठी विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवार (दि.२) पासून पुलाजवळच धरणे आंदोलन सुरू केले. वास्तविक वर्दळीच्या मार्गावरील हा पूल कठड्यांअभावी प्रवासासाठी धोकादायक झाला आहे. कठड्याची दुरुस्ती करावी किंवा नवीन कठडे लावावे यासाठी वारंवार निवेदने देऊनसुद्धा पुलाला संरक्षक कठडे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे २ फेब्रुवारीला प्रहार, युवारंग, माकपा, मनसे, शिवसेना आणि वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नदीपुलाजवळ बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली.याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित बनकर, युवारंगचे अध्यक्ष राहुल जुआरे, प्रहारचे सेवक निखिल धार्मिक, माकपाचे जिल्हा महासचिव अमोल मारकवार, युवारंगचे उपाध्यक्ष मनोज गेडाम, शिवसेना तालुका अध्यक्ष महेंद्र शेंडे, वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाणे, सचिव दीपक सोनकुसरे, अंकुश गाढवे, युवारंगचे नेपचंद्र पेलणे, संघटक सूरज पडोळे, प्रशांत सोरते, करण गरमळे, जियाऊल पठाण, मनसेचे आशुतोष गिरडकर, किशोर जंवजाळकर उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेची महामार्ग प्राधिकरणकडून अवहेलना
- ऑगस्ट २०२०च्या महापुरात वाहून गेलेल्या या पुलावरील लोखंडी कठड्यांची दुरुस्ती करण्यासाठी युवारंग क्लबने जिल्हाधिकाऱ्यांना वर्षभरापूर्वी निवेदन दिले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी संबंधित विभागाला १९ जानेवारी २०२१ ला पत्र देऊन लोखंडी कठडे लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र महामार्ग विभागाने जिल्हाधिकाऱ्यांची सूचनाही पाळली नाही. कठड्यांची दुरुस्ती न झाल्याने नदीच्या पुलावर अपघात झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला काेण जबाबदार राहणार?
अपघातानंतरच जाग येईल का?- वैनगंगा नदीपुलावरून प्रवास करताना नागरिकांना व वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. जोपर्यंत पुलावर मोठा अपघात होऊन जीवितहानी होणार नाही, तोपर्यंत काहीच करणार नाही, असा निश्चय संबंधित विभागाने केला आहे का? असा संतप्त सवाल आंदोलकांनी केला आहे? जोपर्यंत पुलाला लोखंडी कठडे लावण्यात येणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे या आंदोलकांनी सांगितले.