मंजेगाव येथील प्रकार : जिल्हा परिषद सदस्यांकडून कामाची पाहणीघोट : जलयुक्त शिवार अभियानातून मंजेगाव शेतशिवारात सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र सदर बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून या बांधकामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रंजीता कोडापे व गावकऱ्यांनी केली आहे. मंजेगाव येथील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शेतशिवारात असलेल्या नाल्यावर जलयुक्त शिवार अभियानातून सिमेंट बंधारा मंजूर करण्यात आला आहे. सिमेंट बंधाऱ्याचे खोदकाम केलेल्या नाल्यात तोल जाऊन राजेश्वर तुंकलवार यांचा बैल मृत्यूमुखी पडला. झालेल्या घटनेची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रंजीता कोडापे, चापलवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश लेकलवार, माजी उपसरपंच गंगाधर रामटेके, सुरेश राजुरवार, मधुकर नरोटे, निखील उंदीरवाडे, प्रेमिला तुंकलवार, संतोष गरतुलवार, वसंत तुंकलवार, बंडू बावणे, देवाजी बावणे, मारोती तुंकलवार गेले असता बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आले. सिमेंटचा वापर कमी केला जात असल्याने केवळ रेती व गिट्टी बाहेर दिसत आहे. सिमेंटचा मसाला अत्यंत कमी प्रमाणात वापरला जात असल्याने बंधाऱ्यासाठी वापरलेले लोखंड बाहेर दिसत आहे. या कामाबाबत अभियंत्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता, सदर कंत्राटदाराला कामात सुधारणा करण्याची सूचना दिली असल्याचे अभियंत्याने सांगितले. शासन लाखो रूपये खर्चून जलस्त्रोत वाढविण्याकरिता प्रयत्न करीत असताना अशा प्रकारच्या निकृष्ट बंधाऱ्याने शासनाचे पैसे अनावश्यक खर्च होत आहेत. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. सद्य:स्थितीत सुरू असलेल्या बंधाऱ्याच्या बांधकामाचा दर्जा लक्षात घेतला तर पहिल्या पाण्यातच बंधारा वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीही निकृष्ट दर्जाचे बंधारे वाहून गेल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. या कामाची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रंजीता कोडापे यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या बंधाऱ्यात पडून मृत्यूमुखी पडलेल्या बैल मालकाचे ३० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. कंत्राटदाराच्या चुकीमुळे बैलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बैलाची रक्कम कंत्राटदाराकडूनच वसूल करावी, अशीही मागणी केली आहे. (वार्ताहर)वाहून जाण्याचा धोका४बंधाऱ्याच्या बांधकामाचा दर्जा अत्यंत निकृष्ठ असल्याने सदर बंधारा पहिल्याच पावसात वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास शासनाचे लाखो रूाये अनावश्यक खर्च होतील. झालेले बांधकाम तोडून त्याऐवजी चांगल्या दर्जाचे नवीन बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी गावातील नागरिकांनी अभियंत्याकडे केली आहे.
बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट
By admin | Published: April 16, 2017 12:37 AM