१२४ घरे आपदग्रस्त : अहेरी तालुक्यातील नऊ गावांना फटका; महसूल विभागातर्फे पंचनामाआलापल्ली : १८ मे रोजी अहेरी तालुक्यात सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळामुळे नऊ गावातील १२४ घरे क्षतिग्रस्त झाली. यामुळे ११ लाख ४० हजार ७४५ रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतचा अहवाल अहेरी तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अहेरी, आलापल्ली परिसरात जोरदार वादळासह पावसाला सुरुवात झाली होती. वादळामुळे अनेक नागरिकांच्या घरावरील टिनाचे छप्पर उडून गेले होते. काही नागरिकांच्या घरावरील कवेलू उडाले तर काही घरांवर झाडे कोसळल्याने घरांचे नुकसान झाले. वादळाचा तडाखा पेरमिली, अहेरी, देवलमारी, व्यंकटराव पेठा, गडअहेरी (बामणी), चेरपल्ली, गडअहेरी, चिंचगुंडी, आलापल्ली या नऊ गावातील १२४ घरांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने दुसऱ्याची दिवशी क्षतिग्रस्त घरांचे पंचनामे केले. यामध्ये ११ लाख ४० हजार ७४५ रूपयांचे नुकसान झाले असल्याचे तलाठी व मंडळ अधिकारी यांनी केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल गुरूवारी तहसीलदारांना सादर केला. सदर अहवाल अहेरी तहसीलदारांनी जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे. पावसाळ्याच्या पर्वावर घरांचे नुकसान झाले आहे. शेतीसाठी बियाणे व खत खरेदी करावे की, घराची दुरूस्ती करावी, असा प्रश्न नुकसान झालेल्या नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. प्रशासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
वादळाने ११ लाखांचे नुकसान
By admin | Published: May 21, 2016 1:17 AM