शेतकऱ्यांनी वैयक्तिक तसेच शासकीय योजनेचा लाभ घेऊन शेतात विहीर, शेततळे व बोअरवेल खाेदून सिंचनाची सुविधा निर्माण केली आहे, त्यामुळे तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात उन्हाळी धान पिकाची जास्त प्रमाणात लागवड केली आहे. आरमोरी तालुक्यात यावर्षी ११३ गावांपैकी ८५ गावात २११७ हेक्टर मध्ये उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली असून
तालुक्यातील ५० टक्के शेतकऱ्यांचे धान पिक निसवून लोंबी टाकलेले आहेत. तर काही धान पीक अर्धपरिपक्व अवस्थेत आहेत. गुरूवारला अचानक झालेल्या गारपिटीने धान पिकाचे लोंबीतील ५० टक्के धान झडलेले आहे. काही ठिकाणी धानाचा नुसता देठच (धानाचा दांडा ) उभा दिसत आहे संपूर्ण शेतामध्ये गारांच्या मारामुळे धान झडलेला आहे. त्यामुळे धानपिकाचे नुकसान झाले असून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण होणार आहे. सुरूवातीपासून धान पिकाची जोपासना करून ऐन शेवटच्या स्थितीत निसर्गाच्या अवकाळी गारपिटीने, पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. गारपीट पावसामुळे झालेल्या धान पिकाच्या नुकसानीचे महसूल विभागामार्फत तत्काळ सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.