लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : धानोरा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या अतिदुर्गम दराची येथे येथे उराव समाजाचा कर्मा उत्सव पार पडला. पारपंरिक ढोल-ताशांच्या गजरात सदर उत्सव साजरा झाला. या उत्सवाच्या माध्यातून उराव समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडले. या उत्सवाला ५० गावातील नागरिक उपस्थित होते.दराची येथील संतोष एक्का यांच्या पुढाकाराने व गावपाटील लच्छुराम उईके, लिली केरकट्टा, फब्बी अनुस खलको यांच्या सहकार्याने अशा प्रकारचा उराव समाजाचा उत्सव पहिल्यांदाच साजरा झाला. या उत्सवात छत्तीसगड व गडचिरोली जिल्ह्यातील ५० गावांमधील उराव जातीचे नागरिक उपस्थित होते.कर्मा हा उराव जातीचा सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे. यादिवशी तीन अविवाहीत मुली व एक युवक उपवास ठेवते. या उत्सवात मादर नावाचे विशेष वाद्य (ढोल) वाजविले जाते. याशिवाय उत्सव साजरा होत नाही. सायंकाळी वाजतगाजत सर्व महिला पुरूष जंगलात जातात. तेथे कर्मी जातीचे झाड शोधून त्याची पूजाअर्चा केली जाते. उपवास ठेवणारा युवक झाडावर चडून झाडाच्या तीन फांद्या तोडून झाडाखाली उभ्या असलेल्या तीन युवतींना देतो व त्या फांद्या घेऊन पुन्हा वाजतगाजत गावात पूजास्थळी येऊन या फाद्यांची पूजा केली जाते व रात्रभर त्याभोवती नाचगाणे केले जाते. सामूहिक भोजन सुद्धा केले जाते.कर्मा उत्सवाची तयार नऊ दिवस आधी सुरू होते. उराव जातीचे लोक आपल्या घरी धानाचे बिज रोपन करून ठेवतात व पूजा स्थळी गाडलेल्या करमडाल सभोवती नवव्या दिवशी सजवतात. ढोल, मादर वाजवून उत्सव साजरा करतात. या उत्सवामुळे उराव जातीच्या नागरिकांमध्ये एकोपा निर्माण झाला.
कर्मी झाड आहे उराव जातीचे जीवनरक्षकअडीच हजार वर्षांपूर्वी उराव जातीचे साम्राज्य असलेल्या राज्यावर शेजारील राज्यांनी आक्रमन केले. त्यावेळी उराव जातीचे लोक कमी असल्याने त्यांनी जंगलाचा आश्रय घेतला. या जंगलात कर्मी जातीची मोठ्या प्रमाणात झाडे होती. त्या झाडांच्या पोकळीत लपून उराव लोकांनी आपले जीव वाचविले होते, अशी आख्यायीका आहे. तेव्हापासून कर्मी झाडाला उराव जातीचे लोक जीवनरक्षक मानतात. उराव जातीचे लोक या झाडाची पूजा करतात.