गडचिरोली : संपूर्ण कुटुंबाला जिवानिशी ठार करण्याची ‘स्लो पॉयझन’ प्रयोगाची कल्पना सून संघमित्रा रोशन कुंभारे हिचीच असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. संघमित्राने इंटरनेटवर सर्च केलेले विषारी द्रव पतीची मामी असलेल्या रोझा प्रमोद रामटेके हिने आणून दिले. तिचे तेलंगणा हे माहेर असल्याने हे विष तेलंगणातून मागवले असावे, असा पोलिसांचा संशय आहे.
अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे २० दिवसांत कुटुंबातील पाच जणांची नियोजनबद्धपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना १७ ऑक्टोबरला उजेडात आली. अन्नपाण्यात विष मिसळून शंकर तिरुजी कुंभारे (५२), विजया शंकर कुंभारे, त्यांची विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९, रा. गडअहेरी, ता. अहेरी), मावशी आनंदा ऊर्फ वर्षा उराडे (५०, रा. बेझगाव, ता. मूल, जि. चंद्रपूर), मुलगा रोशन शंकर कुंभारे (२८) या पाच जणांना संपविण्यात आले.
प्रेमच बनले वैरी..; सुडापोटी सुनेकडून विषप्रयोग, कुटुंबातील पाच जणांची हत्या
याप्रकरणी सून संघमित्रा रोशन कुंभारे (२५) व रोशनची मामी रोजा प्रमोद रामटेके (४२), या दोघींना अटक करण्यात आली असून, त्या सध्या दहा दिवसांच्या पोलिस कोठडीत आहेत.
तिघांचीही प्रकृती धोक्याबाहेर
वाहनचालक राकेश अनिल मडावी (रा. महागाव), रोशनचा मावसभाऊ बंटी उराडे व रोशनचा भाऊ राहुल हे सध्या उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी पोलिसांनी सांगितले आहे.
कुणी केली मदत
धोतराच्या बियाच्या विषारी द्रवाचा पहिला प्रयोग फसल्यानंतर संघमित्रा रामटेकेने इंटनेवर दर्प व रंग नसलेले द्रव शोधून काढले. हे द्रव तिला रोझा रामटेकेने उपलब्ध करून दिले. रोझाचे माहेर तेलंगणातील कागझनगर आहे. तेथून तिने हे द्रव मागविले असावे, असा पोलिसांचा अंदाज असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे. रोझाच्या संपर्कात नेमके कोण होते, याबाबत चौकशी सुरू असून, त्यानंतर आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
हा गुन्हा अतिशय नियोजनबद्धपणे केलेला आहे. विषारी द्रव घातक रसायनांपासून बनवलेले आहे. कंपनीच्या नावाबद्दल माहिती देणे उचित होणार नाही. विषप्रयोगासाठी वापरलेले द्रव कुरिअरने मागवले की हातोहात, हे लवकरच स्पष्ट केले जाईल.
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली