वाढत्या उष्णतेचा परिणाम : दुपारी रस्ते होत आहेत ओस; शीतपेयांची विक्री वाढलीगडचिरोली : गेल्या चार दिवसांपासून विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यातही तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला असून शहरी व ग्रामीण भागात रस्ते निर्मनुष्य झाले आहे. शहरी भागात वाढत्या उष्णतामानापासून बचाव करण्यासाठी नागरिक शीतपेय मोठ्या प्रमाणावर खरेदी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मे महिन्यात यावर्षी दुसऱ्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह अकाली पाऊस झाला. त्यानंतर वातावरणातील उकाडा एकदम वाढला. दमट स्वरूपाचे हवामान निर्माण झाले व गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यात प्रचंड उष्णतामान वाढले आहे. विदर्भाचा उष्णतामानाचा पारा ४६ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. गडचिरोली जिल्ह्यात तापमान मोजण्याची कुठेही व्यवस्था नाही. मात्र काही हौशी नागरिकांनी वेबसाईटवर गडचिरोलीच्या तापमानाची नोंद ४६ डिग्री सेल्सिसीअस दाखविण्यात आल्याची माहिती लोकमतशी बोलताना दिली. एकूणच गेल्या दोन-चार दिवसात तापमान प्रचंड वाढले असल्याने खरीप हंगामासाठी शेती मशागतीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांच्याही कामावर परिणाम झाला आहे. सकाळी १० वाजतापासूनच उन्हाच्या झळा जाणवत असल्याने अनेक शेतकरी आता पहाटेच शेतात जाऊन सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत काम आटोपतात. रात्रीही १० वाजेपर्यंत उष्णतामान वाढूनच राहत असल्याचे दिसून येत आहे. शहरातही दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत असून कुलर व वातानुकुलीत यंत्रणेचा वापर अचानक वाढल्यामुळे महावितरण कंपनीचा वीज पुरवठाही अनेक वेळा काही वेळासाठी खंडित होण्याचा प्रकार गेल्या चार-पाच दिवसांत वाढला आहे. वाढत्या उष्णतामानापासून बचाव करण्यासाठी नागरिक शीतपेय व थंड पाण्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पाणी पाऊचची विक्रीही वाढली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
पहाटेपासूनच सुरू होतात शेतीची कामे
By admin | Published: May 22, 2016 1:06 AM