सिरोंचातील घटना : गोदावरी पुलाचे कामसिरोंचा : तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर असलेल्या गोदावरी नदीच्या निर्माणाधिन पुलाच्या बांधकामावर विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. गोपाल परिमल सरकार (२२) रा. हस्तिनापूर जि. मेरड (उत्तरप्रदेश) असे मृतक मजुराचे नाव आहे. २०११ पासून सिरोंचा येथील गोदावरी नदीवर पुलाचे काम एका खासगी कन्ट्रक्शन कंपनीमार्फत सुरू आहे. या पुलाच्या कामावर छत्तीसगड, ओरीसा, आंध्रप्रदेश आदीसह अनेक राज्यातील मजूर काम करीत आहे. नेहमीप्रमाणे रविवारी काम सुरू असताना जनरेटरच्या वायरचा काही मजुरांना धक्का बसला. मात्र या कामावरील मजूर गोपाल सरकार हा अधिकच अस्वस्थ झाला. लागलीच सहकारी मजुरांनी गोपालला सिरोंचाच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र उपचारापूर्वीच गोपालचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बांधकामावरील मजुरांमध्ये प्रंचड शोककळा पसरली. बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान सिरोंचा येथील महावितरणचे अभियंता संतोष रूद्रशेट्टी यांनी तत्काळ सिरोंचा रूग्णालय गाठून मृतकाच्या नातेवाईकांशी चर्चा केली. कंट्रक्शन कंपनीने मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मृतकाचे नातेवाईक व सहकारी मजुरांनी केली आहे(तालुका प्रतिनिधी)
विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू
By admin | Published: September 28, 2015 1:41 AM