कुरखेडा (गडचिरोली) : विषारी वायुमुळे एका मजुराचा विहिरीत गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील चिखली येथे घडली. माधव डोकू नरोटे(५०) असे मृत मजुराचे नाव असून, तो चिखलीनजीकच्या टारटोला येथील रहिवासी आहे.माधव नरोटे हा मागील काही दिवसांपासून चिखली येथील शकील पठाण यांच्याकडे शेतीच्या कामावर मजूर म्हणून काम करीत होता. आज पठाण यांच्या शेतातील पिकाला पाणी द्यायचे होते. त्यासाठी माधव विहिरीच्या बोअरमधील फुटबॉलमध्ये साचलेला कचरा काढण्यासाठी विहिरीत उतरला. मात्र, विहिरीतील विषारी वायुमुळे गुदमरुन त्याचा मृत्यू झाला. माधवचा जीव गुदमरत असल्याचे लक्षात येताच अन्य दोघे जण विहिरीत उतरु लागले. परंतु त्यांनाही गुदमरल्यासारखे वाटू लागल्याने ते लगेच विहिरीबाहेर आले, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. त्यानंतर विहिरीत विषारी वायू असल्याची खातरजमा करण्यासाठी दोरीच्या साह्याने एक जीवंत कोंबडी विहिरीत सोडण्यात आली. काही क्षणातच कोंबडीही मुत्युमुखी पडली.
घटनेची माहिती मिळताच कुरखेड्याचे पोलिस उपनिरीक्षक विलास घिसाडी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. विहिरीत उतरणे धोकादायक असल्याने पोलिसांनी माधव नरोटेचा मृतदेह काढण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला. वृत्त लिहीपर्यंत माधवचा मृतदेह विहिरीतच होता.