गडचिरोली : ग्रामसचिवालयाच्या परिसरात सुरू असलेल्या कामावरून आदर्श सांसद ग्राम येवली येथे कमिटी ग्रामस्थ व कंत्राटदार तसेच एका ग्रामपंचायत सदस्यमध्ये वादंग सध्या गाजत असल्याचे चित्र आहे.गडचिरोली तालुक्यातील येवलीची आदर्श सांसद ग्राम म्हणून निवड करण्यात आली आहे. या सांसद ग्राम कमिटीने ग्राम सचिवालयाच्या सभोवताल संरक्षण भिंत व सौंदर्यीकरण कामाचे नियोजन केले होते. याचा सुक्ष्म नियोजन आराखडाही तयार करण्यात आला होता. मात्र तेथे पाण्याची टाकी असल्याने सभोवताल संरक्षण भिंत करण्याचे नियोजन असतानाही ग्रामपंचायतीने सचिवालयाच्या लगतच्या पाण्याच्या टाकीला लागून पशुवैद्यकीय परिचर निवासस्थानाचे बांधकाम करण्यासाठी खोदकाम सुरू केले होते. या कामाला गावकरी व कमिटीने आक्षेप घेतला. संवर्ग विकास अधिकाऱ्यालाही याची माहिती देण्यात आली. त्यांनी तोंडी सूचना देऊन सदर बांधकाम ग्रामसचिवालय परिसरात करण्यास विरोध दर्शविला व काम बंद केले होते. मात्र ग्रामपंचायतीच्या एका सदस्याने बांधकाम कंत्राटदाराला हाताशी घेऊन पुन्हा परिचर बांधकामासाठी खोदकाम सुरू केले आहे. याला ग्रामस्थांचा विरोध आहे. पाण्याच्या टाकी सभोवताल कंपाऊंड करता येणार नाही, असे असतानाही हे काम रेटून नेले जात आहे. त्यामुळे सांसद आदर्श ग्राममध्ये सध्या वादंग उसळला आहे. (शहर प्रतिनिधी)
खासदार दत्तक ग्राममध्ये बांधकामावरून वादंग
By admin | Published: February 09, 2016 1:09 AM