मार्र्कं डा वनपरिक्षेत्र : कक्ष क्र. १४९२ च्या राखीव वनक्षेत्रात कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क घोट : मार्र्कं डा (कं.) वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील रामक्रिष्णपूर गावालगतच्या कक्ष क्र. १४९२ च्या राखीव वनक्षेत्रात वनविषयक व वन्यजीव कायद्याचा भंग करून अनेकांनी अनाधिकृतपणे अतिक्रमण केले होते. सदर अतिक्रमण गेल्या अनेक वर्षांपासून कायम होते. अखेर वन विभागाने पुढाकार घेऊन या वनक्षेत्रातील अतिक्रमण मंगळवारी काढले. यासंदर्भात मार्र्कंडा (कं.) वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेचे नियोजन करून क्षेत्रसहायक, वनपाल, वनरक्षक आदी कर्मचाऱ्यांच्या ड्यूट्या लावल्या. त्यानुसार वनपाल पेंपकवार, धाईत, वनरक्षक मद्देर्लावार, शिरभये, घोगरे, राठोड, तिमाडे, गरमळे, वनपाल पठाण, वनरक्षक पागे, वनरक्षक झाडे, जेंगठे, जामनकर, वनपाल येमनपल्ली, वनरक्षक लिपटे, येनगंटीवार, मस्के आदींनी इतर वन कर्मचाऱ्यांना घेऊन सकाळच्या सुमारास रामक्रिष्णपूर गावालगतच्या कक्ष क्रमांक १४९२ च्या राखीव वनक्षेत्रात पोहोचले. यावेळी वनकर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर सोबत नेले होते. अनेक नागरिकांनी या जागेत अतिक्रमण केले होते. काहींनी या भागात घर बांधले तर काहींनी शेती विकसित केली होती. वनकर्मचाऱ्यांनी या मोहिमेदरम्यान शेतातील पाळे पूर्णत: सपाट केले. बोडी, विहीर आदींचे अतिक्रमण हटविले. केलेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या कारवाईचा तपशील सहायक वनसंरक्षक वन विभाग आलापल्ली यांना सादर करण्यात आला. मार्र्कं डा (कं.) च्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी या राखीव वनक्षेत्रातील अतिक्रमण काढण्यासाठी वनकर्मचाऱ्यांचे पाच ते सहा पथक गठित केले होते. त्यानुसार वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सदर ही मोहीम राबविण्यात आली. अतिक्रमण काढल्यामुळे कक्ष क्र. १४९२ चे वनक्षेत्र पूर्णत: मोकळे झाले. या कारवाईने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.
वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2017 1:47 AM