विजय वडेट्टीवार यांचा आरोप : संघर्ष यात्रेने कर्जमाफी झाल्याचा दावा लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा फायदा होईल, असा दावा मुख्यमंत्री करीत असले तरी कर्जमाफीच्या वेगवेगळ्या अटी व शर्ती लक्षात घेता केवळ ४० लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळून त्यांचा सातबारा कोरा होणार आहे. उर्वरित ४९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागेल, असा आरोप काँग्रेसचे विधानसभा उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ३१ मार्च २०२१६ पर्यंतच्या थकित कर्जदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असेल तर या कालावधीनंतर ज्यांनी शेतीकरिता कर्ज काढले आहे, त्यांना कर्जमुक्तीचा काहीच फायदा होणार नाही, अशा शेतकऱ्यांची संख्या राज्यात १५ लाखांपेक्षा अधिक आहे. सरकारने ३४ हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ केल्याची घोषणा केली आहे. मात्र यातून काही शेतकरी कर्जमुक्त होतील. जिल्हानिहाय व बँकनिहाय सरकारने आकडेवारी जाहीर केली तर ही कर्जमाफी ऐतिहासिक आहे काय, हे स्पष्ट होईल. मूळातच सरकारला कर्जमाफी द्यायची नव्हती, मात्र विरोधक व शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे शासनाला झुकावे लागले. विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या रेट्यामुळे सरकारला कर्जमाफी द्यावी लागली. त्यामुळे कर्जमाफी हे शेतकरी व विरोधकांच्या आंदोलनाचे यश असल्याचा दावा आ. विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शासनाने संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणीसुद्धा आ. वडेट्टीवार यांनी केली आहे.
राज्यातील अर्ध्याच शेतकऱ्यांना मिळणार कर्ज माफीचा लाभ
By admin | Published: June 26, 2017 1:12 AM