सिराेंचा : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका दारूमुक्त करण्यासाठी तालुक्यातील ५९ गावांनी पुढाकार घेतला आहे. या गावांनी दारूमुक्त निवडणुकीचा ठराव घेऊन गावात दारूला थारा न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार निवडणूक काळातच काही गाव संघटनांनी अहिंसक कृती करीत दारूविक्रेत्यांना धडा शिकविला आहे.
मुक्तिपथतर्फे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे नागरिकांना दारूचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. दारूमुळे निवडणुकीवर काय परिणाम होतात, हेसुद्धा गावकऱ्यांना लक्षात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ४१० गावांनी दारूमुक्त निवडणुकीचा ठराव घेतला आहे. या ठरावामध्ये उमेदवार दारू पिणारा नसावा, मतांसाठी दारूचे वाटप करू नये आणि मतदारांनी दारूच्या नशेत मतदान करू नये. ही तीन मुद्दे केंद्रस्थानी ठेवले आहेत. दारू पिणारा नको आणि पाजणाराही नको, अशी भूमिका तालुक्यातील ५९ गावांनी घेतली आहे.
सिरोंचातील जानमपल्ली, मंडळपूर, जानमपल्ली चक, आदीमुत्तापूर, मद्दीकुंठा, रामकृष्णपूर, अंकिसा चक, अंकिसा माल, नगरम, मेडाराम माल, रायपेठ अली, रंगयापल्ली, मारीगुड्डम, मेडाराम चक, कारसपल्ली, रामनजपूर टोले, रामनजपूर डब्ल्यू. एल, नंदीगाव रै, पेंटीपाका डब्ल्यूएल, मुगापूर, बालमतेमपल्ली, चिपुरडुब्बा रै, तीगलगुडम, टेकडामोटाला, वियमपल्ली, आरडा, राजन्नापल्ली, राजेश्वरपल्ली चक, गर्कापेठा म, वेंकटापूर, बामणी, वेणलया माल, कोट्टापल्ली माल, नदीकुडा, मुत्तापूर माल, सुंकारली, रायगुडम, पेंडलया, पातागुडम, असरअल्ली, रंगधामपेठा, लक्ष्मीदेवीपेठा चक, चिंतरवेला, झिंगानूर चक नं १, वडेली री, झिंगानूर माल, कोरला माल, पर्सेवाडा, बोगाटागुडम, गोलागुडम चक, चिकायाला, दर्शेवाडा, मोयाबीनपेठा, सिरकोंडा चक नं १, सिरकोंडा माल, रमेशगुड्डम, किष्टयापल्ली, लक्ष्मीपुरी, चिंतालपल्ली या ५९ गावांनी ठराव घेत दारूमुक्त निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.