लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुर्गम क्षेत्र असल्याने आरोग्य सुविधा पुरविण्यात येत असलेल्या अडचणी हळूहळू का होईना, दूर होत असल्याने आरोग्यसेवेत सुधारणा होत आहे. परिणामी जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. मात्र कुपोषण निर्मूलनात यंत्रणेला अजूनही अपेक्षित यश आलेले नाही. दरम्यान कुपोषण निर्मूलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या हाती आता स्मार्ट फोन आले असून त्यामुळे त्यांचे काम अधिक अपडेट होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.गेल्या तीन वर्षातील बालमृत्यूचे आकडे पाहिल्यास २०१६-१७ या वर्षात ० ते १ वर्ष वयोगटातील ५२५ बालकांचा तर १ ते ५ वर्षे वयातील ८८ बालकांचा मृत्यू विविध कारणांनी झाला होता. २००१७-१८ मध्ये हे प्रमाण कमी झाले. या वर्षात ० ते १ वर्ष वयातील ५०० बालक आणि १ ते ५ वर्ष वयातील ७० बालकांना जीव गमवावा लागला होता. २०१८-१९ मध्ये बालमृत्यूचे प्रमाण अजून कमी झाले. या वर्षात ० ते १ वर्षे वयोगटातील ४४२ तर १ ते ५ वर्षे वयोगटातील ४५ बालकांचा मृत्यू झाला. यावर्षी एप्रिल महिन्यात ० ते ५ वर्षापर्यंतची एकूण १४ बालके दगावली आहेत.गेल्यावर्षी रुग्णांच्या सेवेत दाखल झालेल्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात जिल्हाभरातील बालकांवर उपचार केले जात आहेत. १०० खाटांच्या या रुग्णालयात दाखल होणाºया रुग्णांचे प्रमाण जास्त असल्यामुळे या रुग्णालयावर आरोग्य सेवेचा मोठा ताण आहे. मात्र आता अतिरिक्त १०० खाटांना मंजुरी मिळाल्याने या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचे संख्याबळ वाढून आरोग्य सेवा अधिक चांगली होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भविष्यात बालमृत्यूचे प्रमाण अजून कमी होऊ शकेल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी सांगितले.जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण मात्र वाढत आहे. बालकांपासून तर गर्भवती माता, स्तनदा मातांना आणि किशोरवयीन मुलींनासुद्धा पोषण आहार देण्याची व्यवस्था आहे. परंतू दुर्गम भागातील तांत्रिक अडचणींमुळे हा आहार अनेक लाभार्थ्यांच्या पोटात जात नाही. त्यासाठी जनजागृती करण्यात यंत्रणा कमी पडत आहे.नेट कव्हरेजअभावी आॅफलाईन सेवाअंगणवाड्यांमधील कामकाजाची दैनंदिन माहिती प्रशासकीय यंत्रणेला मिळण्यासाठी जिल्ह्यातील २२८७ ग्रामीण आणि ८९ शहरी भागातील अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. यामुळे त्यांना माहिती भराव्या लागणाऱ्या ११ रजिस्टरपैकी १० रजिस्टर कमी होऊन ती सर्व माहिती आॅनलाईन अपलोड करण्याचे नियोजन आहे. परंतू जिल्ह्याच्या दुर्गम भागात इंटरनेट कव्हरेजच नसल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी तूर्त ती माहिती आॅफलाईनच भरावी लागणार आहे. त्यामुळे स्मार्टफोनचा अपेक्षित उद्देश साध्य करण्यासाठी वेळ लागणार आहे.मानव विकास मिशनच्या शिबिरांमधून उपचारजिल्ह्यातील ४७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बालरोग तज्ज्ञ नसले तरी या केंद्रांमध्ये महिन्यातून महिन्यातून दोन वेळा बालरोग तज्ज्ञांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी शिबिरे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मानव विकास मिशनच्या निधीतून घेतल्या जाणाऱ्या या शिबिरांमध्ये ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयांमधील बाल आणि स्त्रीरोग तज्ज्ञांना पाचारण करून त्यांच्यामार्फत बालक व महिलांची आरोग्य तपासणी केली जात आहे. वेळीच उपचार मिळून आजारी बालके मृत्यूच्या दाढेत जाण्यापासून बचावत आहेत.
बालमृत्यूच्या संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:12 AM
दुर्गम क्षेत्र असल्याने आरोग्य सुविधा पुरविण्यात येत असलेल्या अडचणी हळूहळू का होईना, दूर होत असल्याने आरोग्यसेवेत सुधारणा होत आहे. परिणामी जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. मात्र कुपोषण निर्मूलनात यंत्रणेला अजूनही अपेक्षित यश आलेले नाही.
ठळक मुद्देकुपोषण मात्र वाढले : अंगणवाडी सेविका झाल्या ‘स्मार्ट’