ग्रामसभेचा ठराव : पाणी साठवण क्षमता झाली आहे कमीरांगी : धानोरा तालुक्यातील रांगी येथील मामा तलावाचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी रांगी येथील नागरिकांनी केली आहे.रांगी येथे असलेल्या मामा तलावाच्या सभोवताल शेकडो हेक्टर धान पिकाची शेती आहे. या शेतीला तलावातील पाण्याच्या माध्यमातून सिंचन केले जाते. ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. गाळामुळे या तलावाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे धान पिकाला पाणी पुरत नाही. उन्हाळ्यात सदर तलाव पूर्णपणे आटतो. त्यामुळे गावातील जनावरे व वन्यजीव यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शासनाने या तलावाचे खोलीकरण करावे, असा ठराव ग्रामसभेने घेतला होता व त्याची प्रत वरिष्ठांकडे पाठविली होती. मात्र या तलावाचे खोलीकरण रखडले आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक तलावांचे खोलीकरण करण्यात येत आहे. रांगी येथील शेतकऱ्यांच्या दृष्टीने सदर तलाव अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानातून या तलावासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)
रांगी तलावाचे खोलीकरण करा
By admin | Published: June 05, 2016 1:16 AM